औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील निवृत्त सहायक फौजदाराला त्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने तीन वेळा मिळून एक लाख आठ हजारांची रक्कम काढून फसवणूक केली. ४ जून रोजी सायंकाळी घडलेल्या याप्रकरणानंतर सोमवारी सायंकाळी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरसिंग किशनसिंग चौधरी (वय ६०, रा. बीड बायपास रोड), असे निवृत्त सहायक फौजदाराचे नाव आहे. त्यांना फसवणाऱ्या भामटय़ाने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या मिलकॉर्नर येथील वेतन खात्यातील रकमेची अचूक माहिती सांगितली. त्याचसोबत त्याने खाते नवी माहितीयुक्त करायचे असल्यामुळे मोबाइल क्रमांक लिंक करायचा असल्याचे सांगत मोबाइल फोनवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून घेतला. बँक खात्याची संपूर्ण माहिती सांगितल्यामुळे चौधरी यांनी भामटय़ावर विश्वास ठेवत ओटीपी क्रमांक सांगताच अवघ्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातील एक लाख आठ हजार ९९८ रुपये भामटय़ाने लांबवले.