दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या म्हशींच्या पारंपरिक सगर उपक्रमास शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. म्हशींना सजवून वाजतगाजत मिरवण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. वसुबारसेला गायींचे पूजन करून दिवाळीला सुरुवात होते. सगरचे निमित्त साधून म्हशींना सजवून वाजतगाजत मिरवले जाते आणि दिवाळीची सांगता होते.
औरंगाबाद शहरात पारंपरिक उत्साहात सगरची मिरवणूक निघाली. नवाबपुरा येथे हेल्यांच्या सगरची जल्लोषात मिरवणूक निघाली. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पृथ्वीराज पवार, हरि पवार, नंदकुमार घोडेले, सचिन खैरे आदी या वेळी उपस्थित होते. पैठणच्या नाथमंदिर परिसरात सकाळी ११ वाजता सगर उत्सवास प्रारंभ झाला. आठवडी बाजार असल्याने या वेळी मोठी गर्दी लोटली होती. या वेळी दोन तास वाजतगाजत म्हशींना सजवून रंगवून मिरवण्यात आले. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.