तुळजापूर येथील नवरात्रात भाविकांची गरसोय होणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवरात्र काळात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, चालत येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा आवश्यक आहे. त्याचबरोबर महामार्गावरील रस्त्यांची डागडुजी तत्काळ करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी सुसज्ज रुग्णवाहिका अहोरात्र या महामार्गावर ठेवा. कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही, तत्काळ प्रथमोपचार मिळतील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यावरून येताना ग्रामपंचायत हद्दीतील तलाव, विहिरी संरक्षित करून ठेवा. भाविकांना चांगले स्वच्छ पाणी प्यायला मिळेल यासाठी उपाययोजना करा, असेही त्यांनी नमूद केले.
यात्रा काळात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करा. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले. राज्य परिवहन आणि कर्नाटक परिवहन यांनी समन्वयाने गाडय़ांच्या फेऱ्यांबाबत नियोजन करावे. तसेच बस स्थानकावर भाविकांच्या साहित्यासाठी लॉकर रूम्स तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. व्यापाऱ्यांची बठक घेऊन त्यांनाही हॉकर्स  झोनची माहिती देण्यात आली असून दुकानांजवळ अस्वच्छता होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.