महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेना पुन्हा सरसावली असून, सेनेचे ६३ आमदार, तसेच २२ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवारी बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमास शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आमदार अर्जुनराव खोतकर उपस्थित होते. भाषावर प्रांतरचना होऊनही बेळगाव, निपाणी, कारवार परिसर महाराष्ट्रात समाविष्ट केला नाही, त्यामुळे तेथील मराठी भाषक १ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळतात. या वेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या स्थानिक नेत्यांसह एन. डी. पाटील हेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदार-खासदारांच्या भेटीसाठी पंतप्रधानांची वेळ घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. सीमा भागातील मराठी भाषक जनतेची महाराष्ट्रात सहभागी होण्याची मागणी पूर्ण व्हावी, यासाठी सुरुवातीपासूनच शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सीमाप्रश्नावर चर्चा घडवून आणण्याचे आपले प्रयत्न असतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जालना जिल्हय़ातील ४७८पैकी बहुसंख्य ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. सरपंच-उपसरपंचांची निवडणूक झाल्यावर त्या ग्रामपंचायतींची यादी आम्ही सादर करू. महाराष्ट्रात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्याचे काम शिवसेनेने नेहमीच केले. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी (दि. ६) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर येणार असून जिल्हय़ातील १ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी रुपयांची मदत वाटप करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता जालना शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, पक्षाचे सचिव खासदार देसाई यांच्यासह मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत यापूर्वी जिल्हा शिवसेनेने केली. त्याचप्रमाणे पूर्वी अन्नधान्याचे वाटपही करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्मृती फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जात आहे, असे ते म्हणाले. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.