News Flash

टँकरवाडय़ात ऊस ‘पितोय’ तब्बल १७२ टीएमसी पाणी!

ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.

टँकरवाडय़ात ऊस ‘पितोय’ तब्बल १७२ टीएमसी पाणी!
गाळपासाठी साखर कारखान्याकडे निघालेल्या ऊसाच्या कांड्यांनी भरलेल्या बैलगाड्या. हे छायाचित्र टिपले आहे बारामतीजवळी सोमेश्वर साखर कारखान्याजवळ. (छायाचित्र - अरूल होरायझन)

दुष्काळी मराठवाडय़ात यंदा ४६ साखर कारखाने ऊस गाळप करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल २ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील १६० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. यातून २० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र असणाऱ्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ४२ हजार हेक्टर ऊस आहे. साखरेचे भाव घसरल्याने कारखान्यांचे अर्थकारण कोलमडले असले, तरी उसाची ही आकडेवारी अतिशोषित पाणलोटातील प्रदेशाची आहे, हे विशेष! हा ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.
एकीकडे तीव्र पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम हातचा गेला असला, तरी जिगरबाज ऊस उत्पादकांनी ऊस पोसला आहे. यातील काही ऊस मध्यंतरी चाऱ्यासाठी तोडला गेला. परिणामी, सर्वसाधारणपणे १८० दिवस चालणारा उसाचा हंगाम या वर्षी १०० दिवसांपर्यंत घसरेल, असे अभ्यासक सांगतात.
वास्तविक, आजही अनेक कारखान्यांनी आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांना गेल्या वर्षीची रक्कम दिली नाही. औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद व जळगाव, तसेच धुळे जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची तब्बल ६८ कोटी ५० रुपये देणी बाकी आहेत. ही रक्कम देण्याचा तगादा सरकारकडून सुरू असला, तरी दरांचे गणित बिघडलेले असल्याने ऊस उत्पादकांना रक्कम देणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कारखान्यातून होणाऱ्या साखर विक्रीचा दर २४ रुपये ९० पसे प्रतिकिलो, तर मळीचा दर ४ हजार २०० रुपये प्रतिटन आहे. इथेनॉलसाठी चांगली मागणीही आहे.
दरम्यान, दुष्काळातील उसाची आकडेवारीही सरकारदरबारी भुवया उंचवायला लावणारी आहे. एक हेक्टर ऊस पिकास सिंचनासाठी नक्त गरज २ हजार मिलिमीटरची असते. हे क्षेत्र खरोखरच उभ्या उसाचे असेल तर या हंगामात उसाने तब्बल १७२ टीएमसी पाणी घेतले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकाच पिकावर पाणी वापरले गेले तर दुष्काळ जाणवणारच, असे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे सांगतात.
काही कारखान्यांनी बॉयलर प्रदीपन सुरू केले आहे. दिवाळीनंतर ऊस तोडणीला सुरुवात होईल तेव्हा ऐन दुष्काळात वापरलेला पाण्याचा हिस्सा जरा लक्षात घेण्याची गरज असल्याचे असल्याचे जलअभ्यासक आवर्जून सांगत आहेत.
जिल्हानिहाय कारखाने, ऊसक्षेत्र हेक्टरमध्ये व अपेक्षित गाळप मेट्रिक टनामध्ये
औरंगाबाद ५ कारखाने, १५ हजार ९४७, १०.२५ लाख
जालना ५ कारखाने, २६ हजार ९६, १३.४६ लाख
बीड ६ कारखाने, ३६ हजार ७३, १९.१८ लाख
(एकूण १६ कारखाने, अपेक्षित गाळप ४२ लाख ८९ हजार मेट्रिक टन)
—————–
नांदेड १८ हजार ७९२ लाख
उस्मानाबाद ३१ हजार
लातूर ४२ हजार ६७८
हिंगोली १७ हजार ६३०
परभणी ३० हजार
(या पाचही जिल्हय़ांचे अपेक्षित एकत्रित गाळप ९९.४४ लाख मेट्रिक टन, चालू होणारे कारखाने २५)
पाणी ‘खाणारे’ पीक!
एक हेक्टर ऊसक्षेत्रासाठी लागवडीपासून तोडणीपर्यंत दोन हजार मिमी नक्त सिंचन पाण्याची गरज. २ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस असल्याची आकडेवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे आहे. या क्षेत्रास लागणारे पाणी गृहीत धरल्यास ४ हजार ८८० दलघमी पाणीउपसा अथवा सिंचन झालेले असू शकेल. म्हणजे १७२ टीएमसी पाणी ऐन दुष्काळात उसावर वापरले गेले असावे. हे पाणी मुख्यत्वे कूपनलिका, विहिरी, लहान तलाव यातून घेतले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2015 1:56 am

Web Title: sugarcane 172 tmc water
टॅग : Sugarcane
Next Stories
1 साठेबाजांविरोधात छापेसत्र; ७ कोटींचा धान्यसाठा जप्त
2 नवगण राजुरीतील जि. प. शाळेचा संकल्प
3 महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक
Just Now!
X