सुहास सरदेशमुख

करोना विषाणूचे अस्तित्व अद्याप कायम  असले तरीही केवळ मुखपट्टया लावून दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेली तोबा गर्दी प्रत्येक शहरात दिसते आहे. टाळेबंदीने आक्रसून गेलेला अर्थव्यवहार गती घेताना गावोगावी उसाच्या फडातही मजुरांची हालचाल सुरू झाली. उसाच्या फडात हाडं गोठविणाऱ्या थंडीतही मजुरांनी तोडणी केली, मोळया बांधल्या आणि दुपारीच मालमोटार भरायला हाती घेतली. मग पोराबाळांना केला उसाचा बिछाना. तान्ह्यला खेळवायला, विंचू काटय़ातून रक्षण करायला मोठा भाऊ होता.

संकटात जगण्याचं बळ एकवटून संपानंतर ऊसतोडणीसाठी मजूर पुन्हा फडामध्ये गेला. या क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांचे कष्ट  अधिकच. पण घरात अंधार नको असेल आणि दीपावली करायची असेल तर  फडात राबायला हवे हे पुन्हा एकदा ठरले आणि पुन्हा तोडणी सुरू झाली.  या वर्षी ६० हजाराहून अधिक विद्यार्थी पुन्हा एकदा उसाच्या फडात गेले.

ऊसतोडणीच्या क्षेत्रात साधारणत: सहा लाख मजूर आहेत. सर्वाधिक स्थलांतर बीड जिल्ह्यातून होणारे. या वर्षी करोना विषाणूचे भय असले तरी त्यावर मात करत मजुरांनी प्रवास केला. काही जण वाटेतच गेले अपघातात. संप काळात कोणी तरी मालमोटारीला आग लावून दिली. रस्त्यावरचा फाटका संसारही जळून गेला. पुन्हा सारे उभे केले. मुकादमांनी कोयत्याची उचल दिली. नवरा बायकोची जोडी म्हणजे एक कोयता. त्याचा दर वाढावा म्हणून संप झाला. त्यातून छुपे राजकारण झाले. मोठे नेते हातवारे करून तावातावाने दृकश्राव्य माध्यमातून भांडले.  मुखेड तालुक्यातील एका छोटय़ा गावात कर्नाटकातून मजूर आलेले. त्यांना राज्यातील या राजकारणाचा ठावठिकाणा नव्हता. त्यांनी पहाटेच काम सुरू केले. पण आता गावोगावी मजूर पोहचले आहेत.  उसाची मोळी तशी २५-३० किलोची पण मालमोटारीपर्यंत  वाहतूक करताना ती लपकते.  श्रमाचं मोल शब्दात मावणार कसे, असा  या महिलांचा सवाल आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?

मुलांच्या क्षेत्रात बीड जिल्ह्यात काम करणारे दीपक नागरगोजे म्हणाले,‘ या कष्टाच्या जगण्याचे मोजमाप असे नाही. पण जी पिढी फडात राबते आहे त्यापेक्षाही त्यांच्याबरोबर येणारे विद्यार्थी ही नेहमीच चिंतेची बाब आहे. जगण्याच्या धबडग्यात ६० हजार मुलांचे काय होणार या प्रश्नाचा गुंता आता करोनामुळे आणखी वाढला आहे.