औरंगाबाद : अठ्ठावीसशे रुपयांवरून अवघ्या चौदाशे रुपयांवर किमत खाली आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची औरंगाबादेत तब्बल १५ हजार रुपयांना विक्री होत असल्याचा प्रकार पुंडलिकनगर पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्य़ामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते औषध विक्रेते, अशी साखळी असून त्यांनी संगणमताने रेमडेसिवीरची तब्बल दहापट किमतीने विक्री केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे.

मंदार भालेराव (वय २९), अभिजित नामदेव तौर (वय ३३, दोघेही रा. शिवाजीनगर) व अनिल ओमप्रकाश बोहते (४०, रा. मौर्या मंगल कार्यालय परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीतील अनिल बोहते हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला घाटी परिसरात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांच्याशी संपर्क केला. औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी मंदार भालेराव हा एक इंजेक्शन १४ ते १५ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती त्यांना दिली. मंदारचा मोबाइल क्रमांकही दिला. सोनवणे यांनी पंच, पंटर व पोलीस शिपाई विलास डोईफोडे यांना मंदार भालेराव याचा नंबर देऊन त्याच्याकडे रेमडेसिवीरची मागणी करण्यास सांगितले. डोईफोडे यांच्याकडे पेन्सिलने खुणा केलेल्या ५०० च्या ३० नोटा दिल्या. पंटरने मंदारशी संपर्क केला असता त्याने सूतगिरणी चौकात १५ हजार रुपये घेऊन येण्याचे सांगितले. ती माहिती पोलीस हवालदार रमेश सांगळे यांना कळवली. पोलिसांनी पथकातील कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती  दिली. मंदारने पंटरकडून १५ हजार रुपये घेतले व तीन तासांत इंजेक्शन देतो म्हणून निघून गेला. रात्री साडे सातच्या सुमारास गारखेडा परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय परिसरात भेटण्यासाठी मंदारने पंटरला बोलावले. बराच वेळा झाल्यानंतरही मंदार येत नसल्याचे पाहून त्याला पुन्हा फोन लावला. रात्री साडेदहाच्या सुमारास मंदार एका दुचाकीवर रेमडेसिवीर घेऊन येताच त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता मंदारने त्याचे मयूरेश्वर मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स असल्याचे सांगितले. तसेच त्याने इंजेक्शन इंद्रा मेडिकलचे मालक अभिजित तौर याच्याकडून पंधराशे रुपयांचा नफा मिळवत घेतल्याचे सांगितले. शिवाय घाटीतील कर्मचारी अनिल बोहते याच्याकडून तीन रेमडेसिवीर घेतल्याची कबुली मंदारने दिली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक रावसाहेब मुळे हे करत आहेत.

 

आरोपींना पोलीस कोठडी

मंदार भालेराव, अभिजित तौर व अनिल बोहते यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी आरोपींना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन साडेपाच हजार रुपयाला!

बीड : करोना बाधित रुग्णांसाठीची रेमडेसिविर इंजेक्शन चौदाशे रुपयांऐवजी चक्क साडेपाच हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित औषध विक्रेत्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेली स्वतंत्र समिती केवळ औपचारिकताच असल्याचे दिसून येत आहे.  शुक्रवारीही नवीन करोना बाधितांची संख्या एक हजाराच्या पार गेली.

बीड जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा दरदिवस एक हजाराच्या वर येत असल्याने सरकारी आणि खाजगी रुग्णालये पूर्णपणे भरली असल्याने नवीन रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी नातेवाइकांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी तर नातेवाइकांच्या नाकेनऊ आले असून तुटवडा आणि त्यात काळाबाजार होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन केली. मात्र ही समिती केवळ औपचारिकता ठरली असून इंजेक्शनचा काळाबाजार राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.  लाईफलाईन रुग्णालयाच्या औषधी दुकानात चौदाशे रुपये किंमतीचे इंजेक्शन थेट ५ हजार ४०० रुपयांना विकण्यात आले. या प्रकरणी संतोष सोहनी यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  जिल्ह्यात शुक्रवारीही एक हजार पाच नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.