पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढल्याने यंदा बहुतांशी गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करताना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास हात पुढे केले. या पाश्र्वभूमीवर आष्टीचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांच्या बाबाजानी प्रतिष्ठान गणेश मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल लावली. ‘पुण्याची फटाकडी’ या लावण्यांच्या कार्यक्रमास आमदार धोंडे व माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी हजेरी लावली. मात्र, माजी आमदार सुरेश धस यांनी याचे भांडवल करून टीकेचे बाण सोडल्याने आजी-माजी आमदारांचा राजकीय फड चांगलाच रंगला.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने सर्वत्रच सार्वजनिक उत्सवातील खर्च टाळून शेतकऱ्यांना मदतीची भूमिका घेतली जात असल्याने अनेक ठिकाणच्या गणेश मंडळांनीही दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून दुष्काळग्रस्तांना निधी दिला. दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार धोंडे यांच्या बाबाजानी प्रतिष्ठान मंडळाने मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कायम ठेवली. बुधवारी रात्री पुण्याची फटाकडी या लावण्यांच्या कार्यक्रमाला धोंडे यांच्यासह माजी आमदार दरेकर यांनी हजेरी लावून लावण्यांच्या अदाकरीचा आनंद घेतला. मात्र, या उपस्थितीवरून दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदारांवर टीकेचे बाण सोडले. धस यांनी धोंडे हे केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या सहानुभूतीच्या लाटेत अपघाताने आमदार झाल्याचा आरोप केला. यंदा दुष्काळामुळे सर्वत्र मंडळांना साधेपणाने उत्सव साजरे करा, असे आपण सांगत असताना आमदारांनी लावणीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यामुळे त्यांची दुष्काळाबद्दलची संवेदना स्पष्ट झाली. तालुक्यात सगळा कारभार रामभरोसे चालू असल्याचा टोलाही धस यांनी लगावला.
यावर बोलताना धोंडे यांनी धस यांना लावणीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते म्हणून त्यांना दुख झाले. निमंत्रण असते तर तेही आले असते, असा प्रतिटोला लगावला. सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिले आहे. केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निमंत्रण दिल्यामुळे मी लावण्याच्या कार्यक्रमास हजर होतो. पण धस या प्रकरणाचे राजकारण करीत असल्याने त्यांच्यातील असंवेदनशील वृत्तीचा प्रत्ययच देत असल्याचा टोला लगावला. फटाकडीच्या कार्यक्रमावरून सुरू असलेल्या राजकीय फडामुळे बाबाजानी प्रतिष्ठानने तुमच्यासाठी काय पण हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द केला.