News Flash

उद्योजकासह पत्नी, नातवावर प्राणघातक हल्ला

अज्ञातांकडून धारदार शस्त्राने घरात घुसून वार

प्रतिनिधिक छायाचित्र

अज्ञातांकडून धारदार शस्त्राने घरात घुसून वार

औरंगाबाद : शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील रघुवीर नगरात राहणाऱ्या प्रॉम्टन मोटर्सचे मालक पारस छाजेड (वय ७८), शशिकला छाजेड (वय ७०), पार्थ छाजेड (वय १६) यांच्यावर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घरात धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत छाजेड कुटुंबातील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला करण्यामागचे कारण वैयक्तिक अथवा उद्योगातून झालेल्या व्यवहातून घडले आहे का, याचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सांगितले. दरम्यान, घटनेच्या वेळी सीसीटीव्ही व पथदिवेही बंद असल्यामुळे हल्लेखोर कोण, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

पारस छाजेड यांच्या घरातील सदस्य आशिष छाजेड हे मित्रांसोबत कामानिमित्त घराबाहेर गेले असता, रात्री साडेदहाच्या सुमारास कोणीतरी अज्ञातांनी छाजेड यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. पारस छाजेड यांनी दरवाजा उघडताच त्यांना काही कळायच्या आत हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने त्यांच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली. छाजेड यांनी ओरडण्यास सुरुवात करता त्यांची पत्नी त्यांच्या दिशेने धाव घेत आल्यावर हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला चढवला.

आरडाओरड ऐकून त्यांचा नातू त्यांच्या खोलीच्या बाहेर काय चालले आहे, हे पाहण्यासाठी आला तेव्हा त्याच्यावर देखील वार करण्यात आले. घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या सुनेला खाली काही तरी विपरीत प्रकार घडल्याची भनक लागताच, त्यांनी पती आशिष छाजेड यांना तत्काळ फोन लावत बोलावून घेतले. ते घरी तत्काळ येताच घरात अजून हल्लेखोर असल्याच्या संशयाने त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क केला आणि त्यांच्या पत्नीला तिथे असलेल्या दोन-तीन जणांच्या साहाय्याने शिडी लावत घराबाहेर काढले. पोलिसांनी सर्व घर तपासत हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतले. गुन्हे शाखेसह जिन्सी ठाण्याचे पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करत होते. घरात १० सीसीटीव्ही लावण्यात आले असता निम्यापेक्षा जास्त सीसीटीव्ही बंद असल्यामुळे त्यातूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. छाजेड यांच्या घराशेजारी आणि मागील ठिकाणी असलेल्या शाळांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले असून त्याच्यातून काही मिळण्याची शक्यता वर्तवली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2019 2:31 am

Web Title: unknown man attack with weapon on entrepreneur and her wife
Next Stories
1 हेल्मेट असेल तरच दुचाकी होणार सुरु; औरंगाबादच्या विद्यार्थ्याची स्मार्ट निर्मिती
2 औरंगाबादेत मध्यरात्री थरार, चोराचा घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला
3 बनावट कागदपत्राआधारे एचडीएफसी बँकेला कोट्यवधींचा चुना 
Just Now!
X