दोषारोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई

तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार व खुनाच्या प्रकरणात तीन नराधमांना अटक करण्यात आली असली तरी पोलीस मात्र फक्त एकाच आरोपीचे हे कृत्य असल्याचे दाखवून त्याप्रमाणे कागदपत्रे तयार करीत असल्याचा आरोप पीडितेचे नातेवाईक आणि कोपर्डीच्या ग्रामस्थांनी केला असून तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व जिल्हा पोलीस आधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गुन्ह्य़ाला दोन महिने होत आले तरीही पोलीसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले नाही. सरकार व पोलीस प्रकरणास वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार सामूहिक आणि जातीय सलोख्यातून झाला नाही असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, हे कृत्य एकाच आरोपीने केले, अशी पोलीसांची मांडणी चालली आहे. ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. एकाच आरोपीला अटक करुन तपास गुंडाळण्याचा प्रयत्न होता. मात्र सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आणि पोलिसांनी ऐकून चौघांना ताब्यात घेतले व त्यातील एकास सोडून दिले.

घटनेनंतर आम्ही नातेवाईक आणि ग्रामस्थ तपासाबाबत पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत, तपासासाठी सर्व मदतही केली, मात्र अद्यापि न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलेले नाही. काही पोलीस आधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर तपासाबाबत आम्हाला संशय येत आहे. पोलिसांनी प्रकारणाला त्यांना हवे तसे वळण देण्याचा किंवा आरोपींच्या सुटकेसाठी संधी ठेवली तर त्याचा मोठा उद्रेक राज्यात होईल. अशी कृती पोलीसांकडून होवू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहाता लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर लालासाहेब सुद्रिक, झुंबर सुद्रिक, सतिष सुद्रिक, सरंपच शिवाजी सुद्रिक, बंकट सुद्रिक, गिताराम सुद्रिक, अजिनाथ सुद्रिक, रामचंद्र सुद्रिक, गणपत सुद्रिक, शामभाउ सुद्रिक आदींच्या सहया आहेत.