औरंगाबाद जिल्ह्यात दारूबंदी विरोधात आज महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. शिऊर बंगला येथील महिलांनी देशी दारूच्या दुकानावर आज हल्लाबोल केला. गावात ‘बाटली आडवी’ व्हावी यासाठी एकत्र येत महिलांनी देशी दारूच्या दुकानावर मोर्चा काढला. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर फेकून देत, दुकानांची तोडफोड केली. तसेच दुकानातील दारुच्या बाटल्या पेटवल्या.

शिऊर येथील उपबाजारपेठेच्या परिसरातील या दुकानाला दारु विकण्याचा परवाना आहे. मात्र, दारू दुकानामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने दुकानाचे मालक एस आर गुट्टे यांच्याकडे दुकान बंद करण्याची विनंती महिलांनी केली. त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुकान बंद करावं, या मागणीसाठी महिलांकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. मात्र त्यावर काहीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे दुकान कायमचे बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केलं. त्यानंतर महिला आंदोलकांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या मांडला. मद्यपींची मोठी गर्दी या दुकानावर असते. दारू पिऊन महिलांना पतीकडून मारहाण होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज दुकानावर हल्ला चढवला. दारूची होळी करून दुकानाला टाळ ठोकलं. तर दुसरीकडे वैजापुरमध्येही महिला मोठ्या संख्येने दारूबंदीसाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी भव्य असा मोर्चा काढला.