गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेने पुकारलेला कोयता बंद संप चिघळत चालला असून, दोन दिवसांपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावातून जाणाऱ्या ऊसतोड मजुरांना अडवून धरण्यास सुरुवात केल्याने ऊसतोडणी मजूर असलेल्या पट्टय़ात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी थेरला फाटय़ावर भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात चाललेली ऊसतोड कामगारांची वाहने अडवून मजुरांना परत गावाकडे, तर वाहन चालकांना वाहनासह पळवून लावल्याने आंदोलन तीव्र स्वरूप धारण करू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर गावात काम नाही आणि ऊसतोडणीला जाऊ दिले जात नाही, असे चित्र निर्माण झाले असून मजुरांची मात्र कोंडी झाली आहे.
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेने यंदा मागील वर्षी जाहीर केलेली २० टक्के अंतरिम वाढ आणि ८० टक्के मजुरीत वाढ, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ यासह नव्याने करार करावा, या मागणीसाठी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यातील साखर कारखाने गळीत हंगाम सुरू करतात. जिल्ह्यातून जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त लोक विविध कारखान्यांवर जातात. त्यामुळे राज्यभरातील कारखान्यांच्या हजारो मालमोटारी व इतर वाहने गावागावांत दाखल झाली आहेत. मात्र, धारूर पट्टय़ात मोठय़ा संख्येने ऊसतोड मजुरांना अडविण्यात आले. बुधवारी पाटोदा तालुक्यात थेरला फाटय़ावरून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी तब्बल २० वाहने अडविण्यात आली. या वाहनातून जवळपास पाचशे मजूर चालले होते. या सर्वाना उतरवून गावाकडे परत पाठवण्यात आले, तर संप असताना परस्पर मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना पळवून लावण्यात आले.
भाजपचे माजी आमदार केशवराव आंधळे, जिल्हा सरचिटणीस अॅड. सर्जेराव तांदळे, विष्णुपंत जायभाय, संतोष राख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही वाहने अडवून ऊसतोड मजुरांना संपात सहभागी होण्याचे बजावले. एकूणच दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात हाताला काम नाही, पदरात पसा नाही अशा स्थितीत कारखान्यांवर निघालेल्या ऊसतोड मजुरांनाही अडवून धरण्यात येत असल्याने सरकार आणि संघटनेच्या खेळात मजुरांची मात्र कोंडी झाली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर संघटनेतील सर्व पदाधिकारी भाजपचेही पदाधिकारी असून संघटनेचे नेतृत्व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. सरकारमध्ये मंत्री आणि साखर संघात संचालक असलेल्या पंकजा मुंडे यांना नेता मानणाऱ्या ऊसतोडणी मजूर व मुकादम संघटनांनी कोयता बंद आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे.