दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडय़ाला सात टीएमसी पाणी देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यावर टीकाटिप्पणी सुरू झाल्यावर टप्प्या-टप्प्याने २१ टीएमसीची योजना पूर्ण केली जाईल, असे घूमजाव त्यांनी केले. मात्र, आता जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी मराठवाडय़ाला सात टीएमसीशिवाय थेंबभरदेखील अधिक पाणी मिळण्याची शक्यता खूप कमी असल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आíथक मदत देण्यासाठी सेनेच्या मंत्र्यांचा ताफा शुक्रवारी उस्मानाबादेत दाखल झाला. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी मराठवाडय़ाच्या २१ टीएमसी पाण्याबाबत सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट केली. मराठवाडय़ाला ७ टीएमसीशिवाय थेंबभरदेखील अधिक पाणी मिळण्याची शक्यता नाही. देशातील एकाही खोऱ्यात मराठवाडय़ाला देण्यासाठी आगाऊ पाणी शिल्लक नाही. सात टीएमसी पाणीसुद्धा आंध्र प्रदेशच्या धरणांतून पुढे वाहून जाणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यासाठीदेखील साडेचार हजार कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पावरच मंत्री शिवतारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील सात टीएमसी पाणी मराठवाडय़ास मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर टप्प्या-टप्प्याने २१ टीएमसीचा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. आता मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांपूर्वी केलेले विधान शिवतारे यांच्या गौप्यस्फोटामुळे उघडे पडले आहे. शिवतारे यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेलाच आव्हान दिले आहे.
आघाडी सरकारने कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही अतिशय बनावट योजना आखली होती. मागील सरकारला बनावट संबोधत आहे, असे सांगून हवे तर त्याबद्दल त्यांनी माझ्यावर खटला भरावा, असे आव्हानही शिवतारे यांनी दिले. राज्य सरकारच्या कोकणात केमिकल झोन करण्याच्या घोषणेलाही सेनेने कडाडून विरोध केला. कोणत्याही स्थितीत कोकणात केमिकल झोनला सेना समर्थन देणार नाही अशी पक्षाची भूमिका असल्याचे शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात आरोग्यमंत्री दिसले तर काँग्रेस कार्यालयास कळवा, असे फलक लावले आहेत. त्यास प्रत्युत्तर देताना मंत्री डॉ. सावंत यांनी नितेश आणि नारायण राणे कधी कोकणात राहतात का, असा प्रतिसवाल केला.