औरंगाबाद : लस घेतली नाही तर पेट्रोल नाही, वेतनही मिळणार  नाही तसेच सरकारी कार्यालयात प्रवेश नाही अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी रांगा दिसू लागल्या आहेत.  गेल्या तीन दिवसांत ६५ हजार नागरिकांनी लस मात्रा घेतली. लसीकरणाला वाढता प्रतिसाद मिळत असला तरी मनपाचे मनुष्यबळ कमी पडत असल्याचे  दिसून येत आहे. 

करोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरणाला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोरपणे भूमिका राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत लशीचा एकही डोस घेतला नाही, त्या नागरिकांनी रांगेत उभे राहून लशीचा पहिला डोस घेण्यास सुरुवात केली आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा दिसताच लसीकरणाची वेळ दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजर्पेयत लसीकरण केंद्र सुरू असणार आहे. लसीकरणासाठी १३६ कर्मचारी ठेवण्यात आले. अत्यंत कमी मनुष्यबळावर दररोज तब्बल ७१ ठिकाणी लसीकरण, करोना तपासणी करणे प्रशासनाला अशक्यप्राय होत आहे. ६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असून चार केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत लसीकरण सुरू आहे.  घाटी रुग्णालयाकडून १० कर्मचारी लसीकरणासाठी घेण्यात आल्यानंतरही  कर्मचारी कमीच पडत आहेत. सोमवारपासून लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.

शहरात आतापर्यंत १५ हजार ते १७ हजारापर्यंत लसीकरण झाल्याची नोंद आहे. ही नोंद खासगी लसीकरण धरून झालेली आहे. मात्र, आता महापालिकेतर्फे लसीकरण होत असल्यामुळे बुधवारी २० हजार ५०५ तर गुरुवारी दिवसभरात तब्बल २२ हजार १८७ आणि शुक्रवारी २२ हजार १७५ इतके विक्रमी लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कमी मनुष्यबळ असतानाही आहे त्या कर्मचाऱ्यांचे नियोजन केले जात असल्याने लसीकरणाचा आकडा वाढत चालला आहे.