छत्रपती संभाजीनगर : कत्तलीच्या उद्देशाने सिटी चौक पोलीस ठाणे ते बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीतील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या जागेत बांधून ठेवलेल्या ८६ गोवंशांची बुधवारी दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत केलेल्या कारवाईत सुटका करण्यात आली असून, एकूण २० लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिर्झा अनिस बेग मिर्झा हमीद बेग, नदीम खान नईम खान व इस्तियाक बाबूमीय कुरेशी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.
सिटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी व बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या पथकाने या चार कारवाया केल्या. पहिली कारवाई दुपारी १२ च्या सुमारास सिटी चौक ते किल्लेअर्क रोडवरील एका प्रार्थना स्थळामागील समीर शेख यांच्या जागेमध्ये केली. तेथे बांधून ठेवलेले ७२ गोवंश आढळून आले. त्यानंतरच्या कारवाया कॅन्सर हॉस्पिटल मागील कुरेशी यांच्या जागेत, चित्तेखाना कब्रस्तानजवळ आणि जलाल कॉलनीच्या परिसरात दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.