छत्रपती संभाजीनगर : कन्नड अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मधून २०२१ ते २०२३ या कालावधीत ८७ लाख २३ हजार ७६८ रुपयांच्या झालेल्या व्यवहारात ठेवीदार, सभासद व शासनाचा विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी १४ जणांविरुद्ध कन्नड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये सोसायटीचे संस्थापक व्यवस्थापक, अध्यक्ष, संचालकांचा समावेश आहे.

याप्रकरणी कन्नड सहकारी संस्था कार्यालयातील उपलेखा परीक्षक शेख सलाऊद्दीन कुदुबद्दीन (वय ५३) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून संस्थापक व्यवस्थापक जयंत बाळकृष्ण कुलकर्णी, अध्यक्षा मनीषा जयंत कुलकर्णी, उपाध्यक्ष दशरथ गोरखनाथ सामोसे, संचालक अप्पासाहेब दळे, संजयकुमार पांडे, सचिन जाधव, युवराज चव्हाण, राजू नवले, उमेश नंदकिशोर नाटाणी, शिवाजी धनेश्वर, अर्जुन चव्हाण, सतीश शेजवळ, प्रियांका साळुंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी बेकायदेशीरपणे संगनमताने बँकेचे सर्व कायदे नियम, पोटनियम याकडे दुर्लक्ष करून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने ८७ लाख २३ हजार ७६८ रुपयांची ठेवीदार, सभासद व शासनाची फसवणूक केली. विश्वासघात करून बाह्य बिनतारण कर्ज अदा करणे, कर्जरोखे नसताना अदा करणे, एकरकमी कर्ज फेड योजना मंजूर नसताना काही ठरावीक कर्जदारांना सूट देणे, लिंकिंग शेअर्सच्या रकमांबाबत गैरव्यवहार करूनही रोखीने रकमा कर्ज खात्यावर जमा करणे आदी प्रकारातून हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.