दुष्काळी भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी अभिनेते ठामपणे उभे राहू लागले आहेत. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यानंतर हिंदी चित्रपटातील अभिनेता अक्षयकुमार यानेही बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अक्षयकुमारचे स्वीय सहायक वेदांत बाली यांच्या हस्ते मंगळवारी तीस शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे १५ लाखांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संध्याकाळी आयोजित जातीय सलोखा कार्यक्रमात मदतीचे वाटप करण्यात आले. नांगरे पाटील यांचे अक्षयकुमार हे मित्र आहेत. नांगरे पाटील यांनी अक्षयकुमार यांना दुष्काळग्रस्तांना आíथक मदतीबाबत विचारणा केली होती. नांगरे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत अक्षयकुमार यांनी मदत देण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने अक्षयकुमार यांनी धनादेश स्वरूपातील मदत आपला स्वीय सहायक वेदांत बाली यांच्या हस्ते पाठवली.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीनुसार त्यांच्या कुटुंबांना बोलावण्यात आले. तीस शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जि.प.चे अध्यक्ष विजयसिंह पंडित आदींची उपस्थिती होती.