मराठवाडय़ातील वार्ताहरांकडून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ातील आठ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदारांना मतदानादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मतदान केंद्र ठरविणे, त्यातील सोयीसुविधा तपासणे, पाणी, वीज आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया आदी कामे करण्याचा वेग यापुढे वाढविण्यात येणार असून या वर्षी अनेक मतदान केंद्रांवरून थेट मतदान प्रक्रिया तपासली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून २३ एप्रिल रोजी मतदानापूर्वी नामनिर्देशन पत्र सादर करणे, त्याची छाननी आदी प्रक्रियांच्या तारखा सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या. मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्य़ात निवडणूक तयारीचा आढावा पत्रकार बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला.

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्य़ातील १८ लाख ५७ हजार ६४५ मतदारांसाठी १९३६ मतदान केंद्र असतील. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व्हीव्हीपॅटचा उपयोग होणार असून निवडणूक खर्चावरील नियंत्रणासाठी ६८ जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. ३० हजार ५२३ कर्मचारी उपलब्ध असून मतदान प्रक्रियेसाठी २१ हजार ९३५ कर्मचारी लागणार आहेत.

परभणीत १९ लाख ७० हजार मतदार

परभणी- परभणी जिल्ह्य़ात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार असून जिल्ह्यात आतापर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीप्रमाणे १९ लाख ७० हजार ९५४ मतदार आहेत. यासाठी सहा विधानसभा मतदार संघात २१६८ मतदान केंद्रांवर ३४५९ ईव्हीएम मशीन व आठ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात १० हजार ५७५ एवढे नवीन मतदार वाढले आहेत.

मतदार यादीत ४५ हजार नावे दुबार असल्याचा आक्षेप राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. परंतु ७६३ चेहरे सारखे असलेली मतदार नोंदणी आढळली असून ही नावे वगळण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकांसाठी २२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच १५ व्हीडीओ सनिरीक्षक पथक, १८ स्थिर सनियंत्रण पथक असणार आहे. व्हिडीओ चित्रीकरणासाठी चार पथक असतील. आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा हे पाहण्यासाठी ११ पथक असतील.

३७ मतदान केंद्र संवेदनशील

उस्मानाबाद- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची जिल्हा निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली आहे. ३१ जानेवारीपर्यंत अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार १८ लाख ७१ हजार ३८१  मतदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०१९ च्या निवडणुकीत एक लाख ३० हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. सहा विधानसभा लोकसभा मतदार संघातील ११ तालुक्यांत एकूण दोन हजार ११४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी लोकसभा मतदार संघासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ११ तालुक्यांत मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अकरा तालुक्यांत एकूण ३७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या मतदार संघावर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. औसा मतदार संघात १०, उमरगा पाच, तुळजापूर पाच, उस्मानाबाद नऊ, परंडा सात तर बार्शी मतदार संघात एक, असे एकूण ३७ मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाचे सूक्ष्म निरीक्षण असणार आहे.

छावण्यांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणार

बीड- दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर होऊ लागली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात आवश्यक तेथे तातडीने निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अस्तिककुमार पांडे यांनी सांगितले. पाण्याचे टँकर मंजुरीचा निर्णय जिल्हास्तरावरच घेण्यात येणार असून चारा छावण्यांच्या मंजुरीसंदर्भात निवडणूक आयोगाची परवानगी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहा टक्यांनी मतदारांत वाढ

बीड लोकसभा मतदार संघात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी १०.७० टक्क्यांनी मतदारांची वाढ झाली आहे. या वेळी २० लाख २८ हजार ३३९ मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असून दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्य़ांतील तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीला प्रशासन सज्ज झाले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration ready for the lok sabha elections
First published on: 12-03-2019 at 03:00 IST