औरंगाबादमधील कचराप्रश्न पेटला असून बुधवारी दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत ९ पोलीस जखमी झाले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रश्न पेटला असून बुधवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. औरंगाबाद- मुंबई महामार्गावरील मिटमिटा गावाजवळ स्थानिकांनी आंदोलन केले.  संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले. यात ९ पोलीस जखमी झाले आहे. जखमींमध्ये पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा देखील समावेश असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.

शहरात साचणारा तब्बल ६११ टन कचरा उचलून तो कांचनवाडी, मिटमिटा भागात टाकण्यात होता. मिटमिटा येथील ग्रामस्थांचाही कचरा टाकण्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देखील मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या सात-आठ वाहनांपैकी एक गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तर पैठण रोडवरील कांचनवाडीजवळ एसटीसह काही वाहनांवर दगडफेक झाली.

आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई २५ अश्रूधुरांचे नळकांडे फोडण्यात आले. तसेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक देशमुख, राजश्री आडे यांच्यासह ९ कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांची ३, महापालिकेची ४ आणि एका खासगी वाहनाची आंदोलकांनी तोडफोड केली आहे. दोन कचरा गाड्याही आंदोलकांनी पेटवून दिल्या आहेत.

शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेश सुरुच असून २५ ते ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रणासाठी ३ डीसीपी, 6 एसीपी, १५ पीआय, १८ एपीआय तसेच १०० जवानांची एसआरपीची तुकडी, आरसीपीच्या ३ प्लाटूनही तैनात करण्यात आल्या आहेत. विविध पोलिस स्थानकांमधील आणि मुख्यालयातील १३५ पोलीस कर्मचारी, क्युआरटीचे १२ जवान आणि ३० महिला पोलिसांची तुकडी देखील बंदोबस्तात आहेत.

दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले आणि शिवसेना शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांना भेटी दिल्या.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad garbage issue mob stone pelting on mitmita road police injured
First published on: 07-03-2018 at 16:26 IST