पत्नीच्या हत्या प्रकरणातून पतीसह त्याचे आई- वडील यांना संगमनेर येथील सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द करुन तिघांनाही दोषमुक्त केले आहे. अनिल पथवे हे गेली १३ वर्षे तुरुंगात असून उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सावरगाव येथे राहणारे अनिल पथवे यांचे २००३ मध्ये सीताबाई हिच्याशी झाले. १३ नोव्हेंबर २००५ रोजी सीताबाई घरातून गायब झाली. १६ नोव्हेंबर २००५ रोजी तिचा मृतदेह त्यांचे शेजारी केशव जगताप यांच्या विहिरीत आढळला. प्राथमिक अहवालात त्यांनी सीताबाईचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. परंतु अंतिम अहवालात, गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी मृत महिलेची आई शांताबाई यांनी फिर्याद दाखल केली होती.

संगमनेर सत्र न्यायालयाने अनिल, त्याची आई सावित्रीबाई आणि वडील विश्वनाथ पथवे यांना छळ केल्याच्या आरोपातून मुक्त केले. पण खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात तिघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. यावर सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र पुन्हा तिघांचीही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली.

शेवटी उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु झाली.  अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ यांनी आरोपींच्या वतीने कामकाज पाहिले. सुनावणीत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे दोन अहवाल संशयास्पद आहेत. सीताबाई ही १३ नोव्हेंबरला गायब झाली आणि १६ ला तिचा मृतदेह आढळला. मृत सीताबाई ही यापूर्वीही दोन-तीन वेळा घरातून अचानक निघून गेल्याचे स्पष्ट झालेले आहे, असे वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले.

उच्च न्यायालयात न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निर्णय दिला. खंडपीठाने तिन्हीही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पती अनिल पथवे हे गेली १३ वर्षे तुरुंगात आहेत. तर आई- वडीलही सात वर्षे कारागृहात होते. सध्या ते जामीनावर बाहेर होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court aurangabad acquitted husband d in murder case after 13 years
First published on: 06-02-2019 at 11:21 IST