सकाळी शाळेत झेंडा वंदन करायचे आणि दुपारी गोड जेवण करून बहिणीने भावाला राखी बांधायची, असे ठरवून घराबाहेर पडलेल्या चिमुकल्या बहीण-भावाची इच्छा एका अल्पवयीन मोटारचालकाने दिलेल्या जोराच्या धडकेत अपुरीच राहिली. या अपघातात नऊ वर्षीय भावाचा मृत्यू झाला तर बहीण गंभीर जखमी झाली. दोघांच्याही आईच्या डोळ्यांसमोर ही घटना येथील पावन गणपती मंदिरासमोर घडली. अपघातात संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (९ वर्ष, रा. झाल्टा) हा जागीच ठार झाला तर त्याची बहिण श्रावणी शिंदे (वय १२) ही गंभीर जखमी झाली.
चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिंदे हा पहिलीत शिकत होता. १५ ऑगस्टच्या निमित्ताने शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा करून जात होता. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संभाजी बहीण श्रावणी आणि आईसोबत पावन गणपती मंदिराजवळ आले होते. शाळेची बस येण्यास उशीर असल्याने त्याची आई झेंडा खरेदी करण्यासाठी बाजूच्याच दुकानात गेली होती. त्यावेळी भरधाव मोटार चालवत आलेल्या १४ वर्षीय मुलाने संभाजी आणि श्रावणी यांना जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संभाजी आणि श्रावणी यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी संभाजी िशदे याला तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या श्रावणी शिंदे हिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अल्पवयीन मोटारचालकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.