छत्रपती संभाजीनगर – ते दोघे पुण्याला कामासाठी म्हणून निघाले. पण नियतीच्या मनात वेगळे निघाले. दोन तरुणांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला अन हडोळती परिसरात शोककळा पसरली.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोल नाक्यापासून एक किमी अंतरावर गुरुवारी रात्री उशिरा तरुणांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. या अपघातात माधव गुलाब लोहगावे (वय २४) व संतोष संभाजी चिंतले (वय २०) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील धडक देणारी कार नायगांववरून लातुरकडे जात होती. तर दोन्ही दुचाकीस्वार तरुण हे पुण्याला कामाला निघाले होते. हडोळती पासून १ किमी अंतरावर जगळपूर कॉर्नर जवळ रात्री या कारने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातानंतर कारचालक गाडी सोडून फरार झाला.
पोलीस आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह रात्री हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारच्या सुमारास मृत दोन्ही तरुणांवर गावातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
