छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा शिवारातून गेलेल्या रेल्वे मार्गावरील रुळावर सिमेंट गट्टू ठेवून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये सलग दोन रेल्वेंच्या इंजिनाच्या कॅटल गार्डचे नुकसान झाले. सुदैवाने प्रवाशांना काहीही इजा झाली नाही. ही घटना मंगळवारी (दि.९) मध्यरात्री १२.३५ ते १२.५८ दरम्यान घडली.
या प्रकरणात रेल्वेचे पथ कनिष्ठ अभियंता अनुजकुमार सोरनसिंह (२९, रा. करमाड) यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार, नंदीग्राम एक्स्प्रेस (गाडी क्र. ११००१) जालन्याकडे जात असताना चिकलठाणा शिवारातील केंब्रीज चौकाजवळील उड्डाण पुलाखालील रेल्वे रुळावर सिमेंटच्या तुकड्यांना इंजिनाची धडक बसली. यानंतर केवळ काही मिनिटांनी, १२.५८ वाजता छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जाणाऱ्या मालगाडी क्र. बीसीएन-ई च्या इंजिनाचीही तुकड्यांना धडक बसली.
दोन्हीवेळी इंजिनांच्या कॅटल गार्डचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कनिष्ठ अभियंता अनुजकुमार सोरनसिंह यांनी कर्मचारी आशीष झीरवाल यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी आधीच गस्तीवरील कर्मचारी विशाल जाधव, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एन. भास्कराव, उपनिरीक्षक के. चंदुलाल व हवालदार एन.आर. खान उपस्थित होते. याप्रकरणी अभियंता सोरनसिंह यांनी दिलेल्या तक्रारीत, अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून रेल्वे रुळावर तुकडे ठेवले. या खोडसाळपणामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून रेल्वे इंजिनांचे नुकसान झाले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.