छत्रपती संभाजीनगर : खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या जावेद याच्या शहरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असल्याने त्यांची अतिरिक्त मुख्य सचिवांकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात जावेद हा जगातील सर्वांत ‘श्रीमंत’ वाहनचालक असल्याची तिरकस टिप्पणी करत या प्रकरणात अधिक तपशील मिळवून चौकशी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार व माजी मंत्री संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या वाहनचालकास हिबानामाच्या आधारे केवळ एक नव्हे, तर दोन जमिनीचे तुकडे देण्यात आले असून, त्यांचे बाजारमूल्य ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा आरोप यापूर्वी इम्तियाज जलील यांनी केला होता. याशिवाय या प्रकरणात जावेद रसूल शेख यास प्राप्तिकर विभागानेही नोटीस बजावली. मात्र, या नोटिशीमधून त्याला कर लावता येण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण महसूल दप्तरी वादग्रस्त असेल, तर जमीन प्रकरणात कोणाला कर लावायचा, हे ठरवता येणार नाही, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, अनेकांकडून तक्रार आली आहे. ती तक्रार तशी मोठी आहे. आलेल्या तक्रारीची चौकशी करावीच लागते, असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांनी गुरुवारी धाराशिव येथेही अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक ठिकाणी जमीन मोजणीची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे जमीनखरेदी आणि नोंदणी प्रक्रियेवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. पुढील काळात राज्यात जमीन मोजणीसाठी १० खासगी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. रोव्हरच्या साहाय्याने ही मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी १६०० रोव्हर विकत घेण्याचे निश्चित झाले असून, १३०० रोव्हर खरेदी करण्यात आले आहेत. तांत्रिक गुणवत्तेवर एक दरपत्रक निश्चित करून प्रत्येक जिल्ह्यासाठी १० पेक्षा अधिक एजन्सी जमीन मोजणीसाठी दिल्या जाणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.