छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या गणित विषयाला सामूहिक कॉपीचे प्रकरण समोर आल्यानंतर गुरुवारी जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान वैजापूर तालुक्यातील निमगाव येथेही पुनरावृत्तीची घटना समोर आली. या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल असून, त्यात संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्यांसह १३ पर्यवेक्षकांचा समावेश आहे. या माहितीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी दुजोरा दिला आहे.

निमगावातील कल्पतरू शिक्षण संस्थेच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपी प्रकरण आढळून आले. या प्रकरणी वैजापूरचे गटशिक्षणाधिकारी हेमंत केशव उशीर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संस्थाध्यक्ष जी. एस. पवार, सचिव वैशाली पवार, प्राचार्य अजिनाथ काळे, व्ही. एस काटे, सी. यू. जाधव, एस. बी. गुंजाळ, के के. घाटवळे, एच. बी. खंडीझोड, श्रीमती जे. डी. कुदे (पर्यवेक्षक विनायकराव पाटील विदयालय लोणी), आर. बी. जाधव (पर्यवेक्षक विनायकराव पाटील विदयालय लोणी) श्रीमती. व्ही. जी. पवार, जी. एस. डरले, ए. एस. निकम, आर. व्ही कुन्दड, के. एस, सोनवणे, आर. बी. नराडे, एस. एस. आहेर (सर्व पर्यवेक्षक) यांच्यावर गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिऊर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव रणखांब यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात आरोपीतांनी संगणमत करून बारावी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास सहकार्य करून त्यांना दिलेल्या कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र विदयापीठ मंडळ आणि इतर विशिष्ट गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली तेव्हा कॉप्यांचा खच पडला होता. संगणमताने सामूहिक कॉपी सुरू असल्याचे निदर्शनास आले.