छत्रपती संभाजीनगर : सहा एकर १८ गुंठे जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक करण्याच्या कामासाठी यापूर्वी २३ लाख रुपये घेतलेले असताना पुन्हा १८ लाखांची मागणी करून प्रत्यक्ष पाच लाख रुपये स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिराेळकर (वय ५१) व महसूल सहायक दीपक त्रिभुवन (४०) हे दोघे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकले.
या कारवाईला दुजोरा देताना सापळा अधिकारी तथा विभागाचे पोलीस निरीक्षक शांतिलाल चव्हाण यांनी याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. विनोद खिरोळकर व दीपक त्रिभुवन हे दोघेही ताब्यात असल्याचेही सांगण्यात आले.
तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिसगाव येथील ६ एकर १६ गुंठ्ठे जमीन ही वर्ग २ ची असल्याने शासनाची परवानगी घेऊन सर्व नियमानुसार खरेदी खत करून २०२३ मध्ये विकत घेतली आहे. संबंधित जमीन वर्ग २ ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन भरणा करून देण्यासाठी दीपक त्रिभुवन व निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी २३ लाख रुपये मागणी करून या पूर्वी तक्रारदाराकडून तेवढी रक्कम घेतलेली आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.
जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी शासनास नजराणा पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा भरणा करून देण्यासाठी त्रिभुवन व विनोद खिरोळकर हे दोघे तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याकडे लाच म्हणून १८ लाख रुपयांची मागणी करीत होते, अशी तक्रार २३ मे रोजी देण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करताना दीपक त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी १८ लाख रुपये सांगितल्याचे समोर आले. २६ मे रोजी लाच मागणी पडताळणी केली असता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रारदार, आरडीसी विनोद खिरोळकर व दीपक त्रिभुवन यांच्यात लाच रकमेबाबत बोलणे झाले व पाच लाख रुपये सुरुवातीला व संचिका (फाईल) पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत १८ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर दीपक त्रिभुवन याने बोलल्याप्रमाणे पाच लाख रुपये तक्रारदार, त्यांचे सहकारी व पंचासमोर स्वीकारले. त्याचवेळी दीपक त्रिभुवनला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुसऱ्या पथकाने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनाही ताब्यात घेतले. दोघांचीही घरझडतीही सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर अंगझडतीमध्ये दीपक त्रिभुवनकडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व तीन हजार रुपये रोख तर विनोद खिरोळकर यांच्याकडे एक आयफोन १५ प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल व त्यांच्या दालनात ७५ हजार रुपये रोख रक्कम मिळून आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळाली.