छत्रपती संभाजीनगर : विरोधकांनी मतचोरीसारखी धादांत खोटी मांडणी करूनही बिहारच्या निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांना घवघवीत यश मिळाले. विरोधकांचा सुफडासाफ झाला, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवत भाजपा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असा दावा केला. जिथे शक्य असेल तिथे मित्रपक्षांशी युती होईल, परंतु जिथे एकत्र येणे शक्य नाही तिथेही त्यांच्याशी शत्रूसारखे न लढता विरोधात असलेला मित्रपक्ष आहे, याची जाणीव ठेवावी, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अतिवृष्टीग्रस्त ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली असून, उर्वरित पैसेही तीन ते चार दिवसांत जमा होतील, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या विरोधकांनी अलीकडेच मराठवाड्याचा दौरा केला. परंतु त्यांच्या दौऱ्यावेळी माणसे गोळा करताना माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची दमछाक झाली. याचा अर्थ लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही.

येथील चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री येथे बोलत होते. येथील कार्यालय हे विभागीय बैठकीसह प्रदेश कार्यकारिणीची बैठकही येथे आयोजित करण्यासारखे झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजपर्यंत किरायाच्या जागेत पक्षाची कार्यालये चालवली गेली. परंतु २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाची स्वत:ची कार्यालये उभारण्याची इच्छा व्यक्त करून त्यासंदर्भाने सूचना दिल्यानंतर या कामांनी वेग घेतला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासात आणि अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्याचे मोलाचे कार्य दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले आहे. त्यांच्यानंतर मात्र, विकासाच्या प्रवाहातील बंजारा समाज बाजूला पडला, असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक हे आजच्या काळात दुष्काळमुक्तीसाठी राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले.

बंजारा समाजाला पुन्हा प्रवाहात आणले जात असून, पोहरादेवी तीर्थस्थळाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये देण्यात आले. पोहरादेवी तीर्थक्षेत्री येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे त्यांनी सांगितले. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते रविवारी येथे बोलत होते.

स्वातंत्र्यसेनानींच्या हाकेला पटेल यांचा प्रतिसाद

रझाकाराने अत्याचाराची पराकाष्ठा केल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थांनी निजामाविरुद्ध संघर्षाचा लढा उभारला. त्या लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या हाकेला प्रतिसाद देऊन तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी कारवाई केली. त्यानंतरच मराठवाडा मुक्त झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलत होते.