छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविले जाणार आहे.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे योजनांची अंमलबजावणी करून लाभ देण्याचे अभियान तर आहेच, मात्र, हे प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग या अभियानाचा मूळ गाभा आहे. आमच्या लाडक्या बहिणी यांना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये, त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना एक लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील, असे फडणवीस म्हणाले.

२५० कोटींची पारितोषिके

स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटी रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत.