छत्रपती संभाजीनगर : कन्नड नगरपरिषदेने २००२ मध्ये बांधलेली व्यापारी संकुलाची इमारत गुरुवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी पडली. वरच्या मजल्यावरचे गाळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. या इमारतीमधील काही विटा आधी पडल्याने व्यापारी संकुलातील प्रत्येकाने पळ काढला. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी व कोणी जखमी झाले नाही. या व्यापारी संकुलात ३८ गाळे असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषीकेश भालेराव यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ही इमारत धोकादायक असल्याचे पाहणीत दिसून आल्यानंतर गाळेधारकांनी गाळे रिकामे करण्याची नोटीस दिली होती. या इमारतीचे तांत्रिक परीक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
तत्पूर्वी ही घटना घडली. या अनुषंगाने कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले, ही इमारत धोकादायक होती. ती पडली पण आता ती बांधण्यासाठी पैसेच उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणातही निधी उपलब्ध नाही. तसेच जिल्हा नियोजन समितीमध्येही या कामासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अशा घटना घडल्या तर काय करायचे, असा प्रश्नच आहे.’
नव्याने बांधलेल्या इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला काही दिवसांपूर्वी तडे गेले होते. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता होती. नगरपालिकेच्या दर्शनी भागातील वरच्या मजल्यावरील तीन दुकाने खालील चार दुकानांवर कोसळले. ही घटना घडताच तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, प्रशांत काळे, कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप हे पोहचले. ही इमारत कोसळली तेव्हा इमारतीच्या काही भागांत वरच्या बाजूला सुमारे १०० ते १५० नागरिक होते. त्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आले.