विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमापासून सुरक्षित अंतर ठेवणारे काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून पुन्हा पक्षामध्ये सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी कार्यकारिणीतील फेरबदलानंतर पत्रकार बैठक घेतली. या बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नंतर दर्डा यांना स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर खासदार राजीव सातव, विश्वजित कदम, अब्दुल सत्तार यांचा क्रम होता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दर्डा यांचा काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बॅनरवर फोटो झळकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून दर्डा कमबॅक करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडील काळात काँग्रेसच्यावतीने सरकारविरोधात तीव्र आंदोलने छेडण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित ‘इंदूसरकार’ या चित्रपटाला देशभर विरोध करण्यात आला. यावेळी औरंगाबाद काँग्रेसकडूनही निदर्शने केली. मात्र, यामध्ये कुठेही दर्डा यांचा सहभाग नव्हता. पक्षाच्या कार्यक्रमापासून ते एवढे दूर आहेत की, औरंगाबाद पूर्व मधून विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चा देखील रंगत आहे. नोटबंदी, जीएसटी कापसावर पडलेली बोंड अळी या विविध प्रश्नावर सरकारवर थेट हल्ला चढवणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पक्ष आदेश असेल तर निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली. त्यात काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात बॅनरवर दर्डा यांना अग्रस्थान देण्यात आल्यानं तर्कवीतर्कांना पुन्हा उधाण आले आहे. काँग्रेस सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांना याबाबत विचारलं असता, सेवादलाच्या कार्यकारणीशी दर्डा यांचा कोणताही संबंध नाही. मात्र, पक्षाचे नेते असल्याने त्यांचा फोटो बॅनरवर छापण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

१९२३ मध्ये डॉ नारायण सुब्बाराव हर्डीकर आणि महात्मा गांधी यांनी सेवादलाची स्थापना केली. काँग्रेस पक्षाच्या सिद्धांतांचा विचार आणि कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सेवादलावर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवादल काँग्रेस सोबत कार्यन्वित आहे. प्रशिक्षित कार्यकर्ते घडवण्याचं काम सेवादलात सुरु असते. आपल्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत विजय औताडे यांनी सेवादलाच्या कार्यकारिणीत काही बदल केले. त्यासाठी बोलवण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहत असलेल्या दर्डा यांचा फोटो बॅनरवर अग्रस्थानी छापल्याचा विरोधाभास पाहायला मिळाले. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जन-आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी सेवा दलाचे पाच हजार कार्यकर्ते एक दिवस अगोदर जाणार असल्याची माहिती यावेळी औताडे यांनी दिली.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rajendra darda active again in politics in aurangabad
First published on: 05-12-2017 at 18:26 IST