सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : हातउसना उमेदवार म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली. यामुळे महायुतीमध्ये मराठवाडय़ात अजित पवार यांची नेतृत्व मर्यादा केवळ एका मतदारसंघापुरती उरली. अर्चना पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ हाताशी बांधावे लागले. मात्र, पक्षचिन्ह हाती घेतल्यानंतर ‘माझे पती भाजपचे आमदार आहेत तो पक्ष मी कशाला वाढवू, मी महायुतीची उमेदवार आहे,’ असे म्हणत विरोधकांच्या हातात कोलीत दिले.

तडजोडीच्या राजकारणातील अपरिहार्यता म्हणून भाजपने अजित पवार गटास उमेदवारी दिली खरी, पण फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरेश बिराजदार वगळता तसा कोणी मोठा नेता उभा ठाकला नव्हता. त्यामुळे कुपोषित जिल्ह्यात विजयाचा सारा भार अजित पवार यांच्याऐवजी ‘महायुती’ वर आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपमध्ये गेले.

हेही वाचा >>>धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

जीवनराव गोरे आणि राहुल मोटे हे दोन जिल्हापातळीवरचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी राहिले. राजकीय ताकद असणारे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्या गटात फारसे उरलेले नाहीत. तरीही लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा महायुतीमध्ये मान्य करावा लागला. अन्यथा मराठवाडय़ातून अजित पवार यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते.

अजित पवार हे उस्मानाबादचे जावई. सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण.

जनसंघाच्या संबंधाचा दाखला

तुळजापूर, उस्मानाबाद, औसा, बार्शी, परंडा, उमरगा या सर्व तालुक्यांमध्ये तुलनेने राष्ट्रवादी कुपोषित असताना अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे म्हणून अर्चना पाटील यांचा जनसंघाशी असणारा संबंध त्यामुळेच आवर्जून पुढे केला जात आहे. त्यांचे आजोबा जनसंघाचे कार्यकर्ते होते, हे सांगितले जात आहे.