महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या शिवालयमध्ये झालेल्या मविआ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मविआत कोणतेही मतभेद नसल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. तसेच, यावेळी तिन्ही पक्षांना कोणत्या जागा मिळाल्या आहेत याची यादीही जाहीर करण्यात आली. या यादीद्वारे सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सांगलीतून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील प्रयत्न करत होते. पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम पाटलांच्या समर्थनात मैदानात उतरले होते. दोन्ही नेत्यांनी दोन वेळा दिल्लीवारी करून काँग्रेस पक्षश्रेंष्ठींची भेटही घेतली होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाने सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते कोणता निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या विचारांत असल्याचीदेखील चर्चा रंगत आहे.
दरम्यान, विशाल पाटील यांच्या आजींनी म्हणजेच दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी नातवाचे कान टोचले आहेत. शालिनी पाटील यांनी ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्या म्हणाल्या, मला वाटतं चंद्रहार पाटील निवडून येऊ शकतात. मात्र मी विशाल पाटलांबाबत काही बोलले नाही. चंद्रहार पाटील योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं. राहिला विषय विशाल पाटलांच्या उमेदवारीचा तर त्याला आता उशीर झाला आहे. तो विषय आता फार पुढे गेला आहे. निवडणूक आता मतदानाच्या टप्प्यात आली आहे. चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निर्णयाला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनीदेखील मान्यता दिली आहे. दिल्लीचं नेतृत्वदेखील याबाबत फेरविचार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे उमेदवारी मिळायला आता फार उशीर झाला आहे. शालिनी पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
हे ही वाचा >> महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
शालिनी पाटील म्हणाल्या, जो कोणी चंद्रहार पाटलांच्या विरोधात उभा राहू इच्छितो त्या इच्छुक नेत्याला मला ज्येष्ठतेच्या नात्याने एवढाच सल्ला द्यायचा आहे की, ते (चंद्रहार पाटील आणि इतर इच्छुक उमेदवार) काही माझे मित्र किंवा शत्रू नाहीत. इच्छुक उमेदवाराला मी सांगेन की, उमेदवारी हवी असेल तर पाच वर्षे अगोदरच तयारी करावी लागते. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कामं करावी लागतात. तुम्ही तुमच्या घरातल्या कार्यालयात बसून निवडणुकीला उभे राहू शकत नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही केवळ कोणाचेतरी नातेवाईक असणं पुरेसं नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच वर्षे काम केलेलं असायला हवं. पाच वर्षे लोकांशी संपर्क ठेवायला हवा. लोकांची कामं करून तुम्ही निवडणुकीच्या काळात लोकांसमोर गेलात, तुमच्या कामांद्वारे पुढे आलात तर लोकांचं तुमच्याबद्दल चांगलं मत तयार होतं. लोकांचं तुमच्याबद्दल चांगलं मत तयार झाल्यानंतर तुम्ही काँग्रेसकडे तिकीट मागायला हवं. अशा वेळी पक्षदेखील तुमच्याबद्दल विचार करतो. पाच वर्षे काम करा आणि पक्षाने तिकीट दिलं तर निवडणुकीला उभे राहा. अपक्ष निवडणूक लढण्यात काही अर्थ नाही.