|| सुहास सरदेशमुख 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : राज्यातील प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला  प्रयोगिक प्रकल्प मंगळवारी  यशस्वी झाला.

रुग्णांना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायू शुद्धतेचे प्रमाण ९५ पर्यंत गेले असून अन्न व औषधी प्रशासनाने शुद्धता नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती धाराशीव कारखान्याचे अभिजित पाटील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.उत्तर प्रदेश शासनाचे अतिरिक्त सचिव या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशापशयावर लक्ष ठेवून होते. दोन कोटी रुपयांपर्यंत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे राज्यात साखर कारखान्यातून २८ ते ३० टन प्राणवायू प्रकल्प उभे करण्याच्या कामाला वेग येणार आहे. या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू प्रांतामधील प्राणवायू टंचाईवरही मात करता येणे शक्य होणार आहे.

इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू प्रकल्प निर्मितीचे आव्हान उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशीव कारखान्याचे अभिजित पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि राज्य साखर संघांच्या बैठकीत स्वीकारले. त्यानंतर लागणारी यंत्रसामग्री तैवान, चीन, अमेरिका आणि कोरियामधून मागविण्यात आली. प्राणवायू तयार करण्यासाठी मॉलिक्युलर व्हेसल्समुळे हवेतील नायट्रोजन आणि प्राणवायू, अरगॉन आदी वायू स्वतंत्र करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मळी आणि इथेनॉल निर्मितीच्या टाक्यामध्ये गरम हवेचे शीतकरण करून वरच्या बाजूला राहणारा नायट्रोजन काढून टाकला जातो. हवेत प्राणवायूचे प्रमाण २१ टक्के असते ते काढताना अनेक अन्य वायूही त्यात असतात. त्यामुळे रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या प्राणवायूची शुद्धता किमान ९३ असणे अपेक्षित असते. गेली दोन दिवस प्राणवायूची शुद्धता ७४ टक्क्यांवर होती. यंत्रसामग्रीतील दाब आणि शीतकरण प्रक्रियेत बदल करत धाराशीव प्रकल्पातील शुद्धता ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

धाराशीव कारखान्यातून दररोज १६५ घनमीटर प्राणवायू तयार होणार आहे. सर्वसाधारणपणे जम्बो सिलिंडरमुळे सात घनमीटर प्राणवायू भरला जातो. त्यामुळे उस्मानाबादसारख्या प्राणवायू प्रकल्प नसणाऱ्या जिल्ह्यात त्याचा अधिक फायदा होईल.  – कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद

राज्यात ६६ इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत. पण सर्व ठिकाणी हे प्रकल्प उभे करता येणार नाहीत. साखर कारखाने आता बंद झाले आहेत. तसेच वाफ आणि वीज या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे शंभर सिलिंडर भरता येतील अशी स्वतंत्र व्यवस्था आणि प्राणावायू काँसंट्रेटरवरही आम्ही भर देत आहोत. पण या प्रायोगिक प्रकल्पाचा देशभर उपयोग होईल. – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष  राष्ट्रीय साखर संघ

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country first project to produce oxygen from the ethanol project was a success akp
First published on: 13-05-2021 at 00:48 IST