दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सुनील बाबूराव मुंडलिक (वय ३५) असे मृताचे नाव आहे. सुनील व त्यांचा भाऊ संदीप हे दोघे २५ नोव्हेंबर रोजी रात्री पुंडलिकनगर येथे गल्ली नं. २ मध्ये आपल्या घराकडे निघाले होते. रस्त्यातील स्वामी समर्थ मंदिराजवळ सुनील व संदीप या दोघांच्या दुचाकीचा धक्का समोरून येणाऱ्या मनोज जाधव व टीपू शेख यांच्या वाहनाला लागला. त्यावरुन चौघांमध्ये किरकोळ वाद झाला. संदीप व मनोज हे दोघेही रिक्षा चालवत असल्याने दोघांची तोंडओळख होती. यामध्ये या दोघा भावांना आठ ते दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारले, त्यातच सुनील यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृताच्या नातेवाईकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठिय्या मांडत मारहाण करणारांविरुद्ध खुनाचा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपला धक्का लागल्यानंतर संदीप यांनी मनोज यांची माफीही मागितली होती. मात्र तरीही मनोज व टिपूसोबत मागे असलेल्या आठ ते दहा तरुणांनी कोणतीही विचारपूस न करता रॉड, काठ्यांनी संदीप व सुनीलला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करून सर्व तरुण निघून गेले. सुनील व संदीपही कुटुंबीयांना हा सारा प्रकार कळायला नको म्हणून घरी येऊन झोपी गेले.

रात्रभर सहन केलेला त्रास सकाळी सुनीलला असह्य झाला. त्रास अधिकच वाढल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. संदीपने कुटुंबीयांना घडलेला सारा प्रकार सांगितल्यानंतर सकाळी नातेवाईकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे व घाटीत ठिय्या मांडून सुनीलचा मृतदेह मारहाण करणाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. सुनील मुंडलिक यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एक असलेला टिपू शेख हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हा दाखल आहेत. इतर आरोपींची ओळख पटवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सुनील याच्या पश्च्यात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, असा परिवार आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Date of sunil pundalik in aurangabad after attack of 10 people
First published on: 27-11-2018 at 19:22 IST