छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डाॅ. हेमलता ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी बेशुद्ध अवस्थेतच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप म्हणाले, डाॅ. हेमलता ठाकरे यांनी प्रथमदर्शनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे निदर्शनास येत आहे. त्या शुद्धीवर आल्यानंतरच या प्रकाराची नेमकी माहिती मिळेल. तूर्त पोलीस रुग्णालयात दाखल झाले असून, माहिती घेणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्राजवळच डाॅ. हेमलता ठाकरे यांचे निवासस्थान असून, तेथे एक रुग्णवाहिका उभी आहे, त्या रुग्णवाहिकेच्या डाॅक्टरकडे विचारणा केली असता अद्याप काही माहिती मिळाली नाही, असे त्यांनी उत्तर दिले. विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

डाॅ. हेमलता ठाकरे या मागील काही दिवसांपासून तणावात आहे. त्यासंदर्भातील त्यांच्या वरिष्ठांविरुद्धच्या तक्रारी ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या असल्याची माहिती आहे. शिवाय २४ जून रोजी त्यांना सेवक न दिल्याने कागदपत्रांचे गठ्ठे डोक्यावर घेऊनच प्रशासकीय इमारतीतच कार्यालयीन स्थलांतर करावे लागले होते. त्याची छायाचित्रे, चित्रफिती समाजमाध्यमावर पसरल्याने नवी चर्चा आणि विद्यापीठातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

प्रशासकीय यंत्रणेनुसार उपकुलसचिव डाॅ. हेमलता ठाकरे यांची बदली अभ्यासक्रम विभागात बदली करण्यात आली होती. ३ एप्रिल २०२५ चा त्यांचा बदलीचा आदेश होता. बदलीनंतर परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या इमारतीतील दालन हस्तांतरित करण्यासाठी डाॅ. हेमलता ठाकरे यांना कुलसचिवांनी पत्र पाठवले. डाॅ. ठाकरे यांचे नवे कार्यालय मुख्य प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी सर्व दस्तावेज, महापुरुषांची छायाचित्रे व इतर साहित्य हलवण्यासाठी डाॅ. ठाकरे यांनी शिपाई देण्याची मागणी केली. परंतु कुलसचिवांनी आपल्याला शिपाई मनुष्यबळाची पूर्तता केली नसल्याचा आरोप डाॅ. हेमलता ठाकरे यांनी केला आहे. आपल्याला महिला आणि विशिष्ट समुदायातून येत असल्याने उच्च पदस्थांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असून, सतत निलंबन, शिस्तभंगाईची कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप डाॅ. हेमलता ठाकरे यांनी यापूर्वी केलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याला १४ वर्षांपासून सातत्याने त्रास देऊन, मानहानी करून प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार होत आहेत. काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, बेगमपुरा पोलीस ठाण्याकडेही तक्रार केली आहे, सिटी चौक पोलीस ठाण्याकडेही तक्रार केल्याचेही त्यांनी यापूर्वी सांगितलेले आहे. तर कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांना यापूर्वी डाॅ. हेमलता ठाकरे यांच्या तक्रारींवर विचारले असता त्यांनी ठाकरे यांच्या विभागाकडे दोन ते तीन शिपाई असून, त्यांनी डोक्यावर दस्तावेज नेण्याचा प्रकार म्हणजे एक कुभांड आणि विद्यापीठाला नाहक बदनाम करण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच दिलेली आहे.