मांजरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी सुरू झालेल्या जलयुक्त लातूर मोहिमेस आमदार अमित देशमुख यांनी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करणार असल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले. शनिवारी सकाळी सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी कामाची पाहणी करून २५ लाख रुपयांचा धनादेश जलयुक्त लातूरच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला.
रितेश देशमुख यांना या चळवळीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून जाहीर करत असल्याचे डॉ. अशोकराव कुकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जलयुक्त लातूर सार्वजनिक व्यवस्थापन समितीच्या कार्यालयास आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. याप्रसंगी महापौर अख्तर शेख, डॉ. अशोकराव कुकडे, अ‍ॅड. गोमारे, नीलेश ठक्कर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या चळवळीसाठी ७५ लाख रुपये आपण उपलब्ध करून देऊ. साखर कारखाने व विविध संस्थांतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री या कामासाठी देण्याची हमीही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिली.
शनिवारी रितेश देशमुख यांनी सकाळी साई बंधाऱ्यावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व त्यानंतर जलयुक्तच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना स्वत:चा व्यक्तिगत सहभाग म्हणून २५ लाख रुपयांचा धनादेश समितीचे प्रमुख डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे सुपूर्द केला. आपण लातूरकर असल्यामुळे या मोहिमेत स्वत:चे योगदान देणे ही माझी जबाबदारी समजतो. बॉलिवूडमधील मंडळी आपापल्या परीने सामाजिक कामात योगदान देत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून यापुढे या चळवळीसाठी सहभाग वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व स्तरातील मंडळी या मोहिमेत सहभागी होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेसाठी जे जे लागेल ते ते सहकार्य आपण करत राहू. केवळ उन्हाळय़ापुरती ही मोहीम न राबवता एकूण पाणी प्रश्नासाठी दीर्घकाळ या मंडळींनी काम केले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी केली. मकरंद जाधव, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, बी. बी. ठोंबरे, मनोहरराव गोमारे, धीरज देशमुख, अरुण डंके, शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे, आदी याप्रसंगी उपस्थित होते.
किराणा असोसिएशनचे ११ लाख
व्यापारी महासंघाचे प्रदीप सोळंकी यांच्या पुढाकारातून शहरातील विविध व्यापारी मंडळी आपले योगदान देत आहेत. होलसेल किराणा असोसिएशनच्यावतीने ११ लाख रुपयांचा निधी पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला. याप्रसंगी अध्यक्ष बसवराज वळसंगे यांनी ही घोषणा केली. याच बठकीत रेडिमेड असोसिएशनच्यावतीने ५ लाख रुपयांचा धनादेश जलयुक्तच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रदीप सोळंकी, बंडोपंत तांदळे यांनी सुपूर्द केला.
आज दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होऊन त्या कामाने वेग घेतला. रविवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते नागझरीत बंधाऱ्यापासून खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याचे जलयुक्त लातूरच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deshmukh brothers aqueous latura to 1 million
First published on: 24-04-2016 at 01:40 IST