छत्रपती संभाजीनगर – देशभरातील ६ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना ३५ कोटीवर रकमेचा गंडा घालणारा एलएफएस ब्रोकिंग या कंपनीचा संचालक दिलीपकुमार मैती याला सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकत्ता येथील कार्यालयातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, दिलीपकुमार मैतीला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

एलएफएस ब्रोकिंग या कंपनीने २० ते २६ टक्क्यांपर्यंत व्याजदराचे आमिष दाखवून राज्यभरातील गुंतवणूकदारांना फसवले. छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील गुंतवणूकदारांकडून सुमारे ३ कोटी रुपये जमा करून पसार झाले होते. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आधारे तिघांना अटक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय कंपनीविरोधात राज्याच्या विविध भागासह देशातील गुजरात, झारखंड, ओडिशा, बिहार पश्चिम बंगाल आदी काही राज्यांमध्ये फसवणुकीशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडूनही या प्रकरणी कारवाई झालेली असून दिलीपकुमार मैती व अनारूल हसैनीला यापूर्वी त्यांनी अटक केली आहे. भुवनेश्वर पोलिसांकडूनही कारवाई झालेली आहे. कंपनीशी संबंधित संचालकांचे ११८ बँक खाते, हॉटेल, रिसॉर्ट, बंगले, सदनिका, जमीन, दुबईतील इमारत आदी ६३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे.