औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन शुक्रवारी करोनाचे नियम पाळून पण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नामविस्ताराच्या लढय़ात शहीद झालेल्या लढवय्यांचे स्मारकाच्या उभारणीचे भूमिपूजन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या परिसरात नामांतर शहीद स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, प्रभारी कुलसचिव दिलीप भरड, नामांतर शहीद स्मारक समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे, सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, अधिसभा सदस्य सुनील मगरे, अ‍ॅड. विजय सबुगडे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.मुस्तजीब खान आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, आजच्या दिवशी म्हणजेच नामविस्तारदिनीच १४ जानेवारी २०२२ रोजी भूमिपूजन केलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जोईल. तसेच हे स्मारक नवीन पिढीसाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरेल. सध्याचे विद्यापीठाचे प्रवेशद्वार लाखो अनुयायांचे प्रेरणास्थान आहे. हा वारसा जतन करण्यासाठी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे कामही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या सुशोभीकरणामुळे विद्यापीठ परिसराला नवे रुप मिळणार आहे.

बाबासाहेबांच्या पुतळास्थळी अभिवादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त प्रवेशद्वारासमोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायी शिस्तीत दाखल होत होते. आबालवृद्धांनी बाबासाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकाच्या ठिकाणचीही पाहणी करण्यात येत होती. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन केले.