छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करणारे डॉ. गफ्फार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात अल्पसंख्याक मतदारांच्या प्रभाव क्षेत्रात सत्ताधारी गटाला प्रवेश मिळाल्याचे चित्र निमा्रण झाले आहे. विशेष म्हणजे कादरी यांच्या प्रवेशानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून डॉ. गफ्फार कादरी यांनी तीन निवडणुका लढवल्या. २०१४ च्या निवडणुकी ६०२६८ मते मिळवली होती. २०१९ मध्ये त्यात घट झाली. या नंतरच्या निवडणुकीमध्ये खासदार इत्मियाज जलील यांनी जागा वाटप करताना अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि अनागोंदी केल्याचा आराेप करत डॉ. कादरी यांनी ‘ एमआयएम’ पक्ष सोडला होता. जलील यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप होता. त्यांच्या या आरोपामुळे ‘एमआयएम’ मध्ये अनेक प्रकारचे गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. आता डॉ. कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच उमेदवारांची घोषणा करताना ॲड्. असदोद्दीन ओवसी यांनी शेजारी बसलेल्या कादरीचे नाव घेतले नव्हते. तेव्हापासून नाराज असणाऱ्या कादरी यांनी ‘ एमआयएम’ मधील अनेक अनागोंदीवर प्रश्न उभे केले होते. मात्र, त्यानंतर कादरी यांना निवडणुकीमध्ये फारसे पाठबळ मिळाले नाही. आता नव्या पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. सत्तेत भाजपबरोबर साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात एमआयएम वर नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.