चालक-वाहकाला जालना जिल्ह्य़ाच्या हद्दीत शनिवारी मारहाण केल्यानंतर रविवारी सकाळी औरंगाबाद आगारात सकाळी तासभर चक्काजाम करण्यात आला. त्यानंतर दिवसभर भोकरदन तालुक्यातील राजूर (गणपतीचे) येथे जाणाऱ्या एसटीच्या २० फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची ससेहोलपट झाली. औरंगाबाद जिल्ह्य़ातील वाहक-चालकांना झालेल्या मारहाणीची ही दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. हिंगोलीतही चालकाला काही ऑटोचालकासह इतरांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ तीन तास आंदोलन करण्यात आले. अखेर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औंरंगाबाद आगाराची भोकरदनमार्गे राजूर (गणपतीचे) येथे जाणाऱ्या एसटीच्या (एमएच-२०-बीएल-२२८७) वाहकाने खरात नामक एका प्रवाशाला दरवाजा ठीक नाही, पूर्णपणे टेकून बसू नका, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. प्रवासी इलाडी फाटय़ाजवळ उतरला. एसटी पुढे गेली. परतीच्यावेळी इलाडी फाटय़ाजवळील सुन्नरवाडीच्या परिसरात खरात नामक व्यक्तीने काही साथीदारांना घेऊन एसटी थांबवली व वाहकासह चालकालाही बेदम मारहाण केली. यामध्ये चालक जी. टी. मंडावत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उजवा हातही जायबंदी झाला. वाहक ए. के. काकडे यांचाही हात जायबंदी झाला. ही घटना जालना जिल्ह्य़ाच्या हद्दीत घडलेली असल्याने तेथील आगार व्यवस्थापक म्हेत्रे यांच्या वतीने बदनापूर पोलीस ठाण्यात खरात नामक व्यक्तींसह काही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद आगारात रविवारी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान वाहक-चालकांनी चक्काजाम आंदोलन केले. अखेर व्यवस्थापनाने मध्यस्थी केल्यानंतर इतर मार्गावरील वाहने सोडण्यात आली. मात्र राजूरकडे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. राजूर हे गणपतीचे ठिकाण असल्याने या मार्गावर दररोज अठराशे ते दोन हजार प्रवासी ये-जा करतात. त्यातून महामंडळाला ५० ते ५५ हजारांचे उत्पन्न दररोज मिळते. सर्व कामगार संघटना सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटणार असून वाहक-चालकांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

हिंगोलीत बसचालक काशिनाथ नामदेवराव डोरले हे परभणी-हिंगोली एसटी नेत असताना शेख मुसरीफ शेख अजीज व शेख गौस शेख जब्बार यांनी गाडीचा हॉर्न का वाजविला नाही, म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून शनिवारी रात्री डोरले यांना मारहाण केली. छातीत, पोटात मारहाण केली. चालक डोरले यांच्या तक्रारीनंतर रविवारी शहर पोलीस ठाण्यात शेख मुसरीफ व शेख गौससह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक झाली नसल्याने वाहक-चालकांनी रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आंदोलन केले. त्यामुळे संपूर्ण वाहतूक खोळंबली होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver conductor of msrtc assaulted in jalna district
First published on: 01-05-2017 at 03:55 IST