कालव्यातून पाणी सुरूच राहिल्याने धरणातील पाणी मृतसाठय़ाकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सुरूच राहावे म्हणून भाजप नेत्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे धरण पाणीपातळी आता ०.३२ टक्क्य़ापर्यंत खाली घसरली आहे. धरणसाठा मृत पाणीसाठय़ाकडे वाटचाल करीत असल्याने आता अवैध उपसा होऊ नये म्हणून जायकवाडी क्षेत्रात केवळ चार तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महावितरणला दिले आहेत. दरम्यान औरंगाबादच्या उद्योगाला लागणाऱ्या पाण्यात कपात करण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. जायकवाडीमधून यापूर्वी कधी नव्हे एवढे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. यास राजकीय दबाव कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. परभणीपर्यंतच्या उच्चपातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी मंत्र्यांनी खास प्रयत्न केले होते. परिणामी जायकवाडी धरणाची पाणीपातळी कमालीची खाली घसरली आहे.

जायकवाडी धरणात आता ७.१३६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. अजूनही जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी औष्णिक वीज केंद्रास पाणी सोडले जात आहे. खडका बंधारा येथून परळी वीज केंद्राला पाणीपुरवठा होत होता. आता हा बंधारा ६० टक्के भरला आहे. गेल्या काही दिवसांत पैठण उजव्या कालव्यातून १३२ दलघमी व डाव्या कालव्यातून २१८ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. यातून उच्च पातळी बंधारेही भरण्यात आले. ढालेगाव, राजाटाकळी, मंगरुळ, जोगळादेवी, लोणीसांवगी, आपेगाव, हिरडपुरी, पाथरवाला या बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांची पाण्याची गरज भागली आहे, असा दावा सिंचन विभागाचे अधिकारी करत असले, तरी या भागातील उसाला पाणी देता यावे यासाठी भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याचा दबाव होता. परिणामी एवढे पाणी सोडले, की आता जायकवाडीचा पाणीसाठा कमालीचा घटला आहे. पैठणच्या या धरणाची क्षमता अधिक असल्याने २०१५-१६ मध्ये सर्वाधिक २६५ दलघमी पाणी वापरले होते तसेच पाणी या वेळी घ्यावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्यांच्या योजनांवर ताण येणार आहे. म्हणूनच औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता वीज कपातीचा निर्णय कळविला आहे. सध्या जायकवाडी धरणातून ०.९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण  झाली आहे. खरे तर नगर व नाशिक जिल्हय़ातील धरणातून या वर्षी ८.९९ टीएमसी पाणी सोडावे असे आदेश होते. मात्र, त्यापैकी काही पाणी सोडताना बरीच खळखळ करण्यात आली. अखेर जायकवाडी धरणात १३०.२५ दलघमी पाणी आले. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली होती. मात्र, बेसुमार उपसा आणि कालवे सुरूच राहावेत, या नेत्यांच्या आग्रहामुळे पाणीटंचाईची झळ अधिक बसण्याची शक्यता आहे.

असा आहे जायकवाडीच्या पाण्याचा हिशेब

* जायकवाडीतील पाण्याची टक्केवारी – ०.३२

* नगर-नाशिकमधून आलेले पाणी- १३०.२५ दलघमी म्हणजे ४.५९ टीएमसी

* सिंचनासाठी सोडलेले पाणी- उजव्या कालव्यातून १३२ दलघमी ४.६६ टीएमसी

* बॅरेजसाठीचे पाणी- ८३ दलघमी

* परळी औष्णिक वीज केंद्रासाठी खडका बंधारा येथे सोडण्यात आलेले पाणी- २० दलघमी

* औरंगाबाद शहरातील उद्योगांना पाणीकपात करण्यासंदर्भात प्रशासनात गंभीरपणे चर्चा सुरू असून येत्या काळात ही कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रमाण किती असेल आणि टंचाईच्या कोणत्या कालावधीत किती दिवस ते असेल हे मात्र अद्याप ठरलेले नाही.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the reduction of water stock in jayakwadi electricity is expected to water the water
First published on: 20-03-2019 at 01:17 IST