लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : अभियंता असलेल्या मुलाकडून वडिलांचा गळा दाबून व स्क्रू ड्रायव्हर भोसकून खून करून आईचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी सातारा परिसरातील दीपनगरमधील एका स्कूलजवळच्या घरात घडली. विशेष म्हणजे खून करणारा रोहित श्रीकृष्ण पाटील (वय ३०) याने चोरट्यांच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला असून आपल्याही मारण्याचा डाव होता, असा बनाव रचला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्याला विश्वासात घेऊन विचारले असता रोहितने खुनाची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.

श्रीकृष्ण वामनराव पाटील (वय ६२, रा. डिलक्स पार्क) असे मृताचे नाव आहे. रोहित लोकांकडून पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवायचा आणि आलेला नफा टक्केवारीत घ्यायचा. मात्र शेअर मार्केटमधील चढ-उतारामुळे तो ३० लाख रुपये हरला. लोकांनी त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. त्यासाठी तोही वडिलांना पैसे मागत होता, अशी माहिती त्यानेच पोलिसांना दिली. या प्रकरणी मृताची मुलगी गौरी (१८) पाटीलने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रीकृष्ण पाटील हे महावितरणमध्ये नोकरीला होते. त्यांचे सिल्लोड येथेही एक घर आहे. मृत श्रीकृष्ण पाटील यांना एक विवाहित मुलगीही आहे. अधिक माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून मृत श्रीकृष्ण पाटील हे पत्नी, मुलगा रोहित आणि अविवाहित मुलीसह सातारा परिसरात राहत होते.

आणखी वाचा-अकोल्यात वंचितला एमआयएमचा पाठिंबा, पुण्यातही उमेदवार देणार; असोद्दीन ओेवैसी यांची घोषणा

१५ एप्रिलला रात्री चौघांनी सोबत जेवण केले. रात्री ११ वाजता श्रीकृष्ण पाटील हे हॉलमध्ये, मुलगी गौरी आणि तिची आई बबिता खालच्या बेडरूममध्ये आणि मुलगा रोहित वरच्या बेडरूममध्ये झोपी गेले. १६ एप्रिलला सकाळी ६ वाजता आईच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर बाजूला झोपलेल्या गौरीला जाग आली. तेव्हा भाऊ रोहित पोटावर बसून आई बबिताचा गळा दाबत असल्याचे दिसले. ती घाबरून उठली आणि हा प्रकार वडिलांना सांगण्यासाठी हॉलकडे धावली असता वडील आधीपासूनच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. त्यानंतर गौरी पुन्हा आईला वाचविण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता रोहितने आईला सोडून गौरीला मारहाण सुरू केली. तेव्हा कशीबशी सुटका करून मोबाइल घेऊन गौरी बाहेर पळाली. तिने हा सर्व प्रकार विवाहित बहिणीला फोन करून सांगितला. यादरम्यान, रोहितने वडिलांच्या मोबाइलवरून गौरीला फोन केला. आता सर्व संपले आहे. मी पण स्वत:ला संपवितो, असे म्हणाला. मात्र गौरी परत घराकडे गेली नाही. त्यामुळे रोहितने पुन्हा गौरीला कॉल करून घरी येण्याची विनंती केली. त्यावर गौरी घरी गेली असता परिसरातील लोक जमलेले होते.

आणखी वाचा-मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप शशिकांत शिंदे यांनी फेटाळले

आरोपी रोहितने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून घरात चोरी झाल्याचा आणि चोरांनीच वडिलांचा खून केल्याचा बनाव रचला. तसेच आई आणि बहिणीला फोन करून पोलिसांनी विचारले तर रात्री घरी पाहुणे आले होते. त्यांनी वडिलांचा खून करून घरातील ७० लाख रुपये रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगा, असे धमकावले. पोलिसांनी त्याला विचारल्यावर त्यानेही तसाच बनाव रचला. चोराने दोरीने माझा गळा आवळला, पण मी झटापट करून पळालो असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. आईला पाहिले तर तीही बेशुद्धावस्थेत होती. बहीण घाबरून बाहेर पळालेली होती, असा बनाव रचला. मात्र सातारा आणि गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याचा हा बनाव उघडा पडला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सातारा ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी आदींनी भेट दिली.