छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक असलेले बंधू राजू तनवाणी यांचा मुलगा दिपेशने (वय २६)  गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. दिपेश हा उच्चशिक्षित तरुण होता व त्याने विदेशातून व्यवस्थापन शास्त्रातील एमबीए ही पदवी प्राप्त केलेली होती. आत्महत्येपूर्वी त्याने इंग्रजीमधून एक चिठ्ठीही लिहून ठेवल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले.

दीपेश हा आई-वडिलांसह नचलित खडक भागात राहत होता. अलीकडेच तो उस्मानपुरा येथील अमृतसाई एकदंत इमारतीत राहायला गेला होता. राखी पौर्णिमेनंतर सोमवारी दीपेश हा अमृतसाई एकदंत इमारतीत गेला. त्यानंतर मात्र त्याचा कुणाशीही संवाद झाला नाही. दीपेशशी संपर्क होत नसल्याने घरातील मंडळी काळजीत होती. त्याला अनेक वेळा फोन करूनही संपर्क होत नव्हता.

मंगळवारी सकाळी दीपेशचा शोध घेण्यासाठी त्याच्या उस्मानपुऱ्यातील सदनिकेमध्ये काही जणांना पाठवण्यात आले. परंतु घराचे दार आतून बंद होते. अत्याधुनिक कुलूप असल्याने ते उघडत नसल्याने अखेर शेवटी गॅलरीकडील एका खिडकीला फोडून आतमध्ये उतरवण्यात आले तेव्हा दीपेश लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी दीपेशचे पाय बांधलेले होते. त्यामुळे घातपात वगैरेची शंका उपस्थित झाली. परंतु आतमध्ये कोणालाही जाता येत नसल्याने दिपेशनी आत्महत्याच केल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले घटनास्थळी उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.

चिठ्ठीत काय लिहिले ?

दीपेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आय एम नॉट अंडर प्रेशर, दिस इज माय फोल्ट ओन्ली. आय एम सॉरी… असा मजकूर आढळून आला. एका हिशोबाच्या वहीमध्ये त्याने ही चिठ्ठी लिहून ठेवली होती, असे तपासणीमध्ये आढळून आले. दीपेश हा माजी आमदार किशनचंद तणवाणी यांचा पुतण्या तर माजी नगरसेवक राजू तनवाणींचा मुलगा होता. त्याच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.