छत्रपती संभाजीनगर – भाजप प्रवक्त्याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकारी म्हणून उपस्थित राहून सत्कार घेणाऱ्या एका तोतयाची बनवाबनवी पोलिसांच्या सतर्कतेने रविवारी सायंकाळी उघड झाली. त्या तोतया अधीकाऱ्यासह त्याच्या अंगरक्षकाला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या विवाहस्थळी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडेंसह विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, तोतया अधिकारी व त्याच्या अंगरक्षकास सोमवारी न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मुलीचा विवाह तिसगाव-साजापूर परिसरातील ग्रॅण्ड सरोवर हॉटेलमध्ये रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे दिग्गज मंत्री, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्यात सुरु असलेल्या सत्कार समारंभात प्रधानमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून अशोक भारत ठोंबरे याचे नाव पुकरण्यात आले. ठोंबरे हा एका मोठ्या कारमधून लग्नास हजर झाला होता. त्याच्या कारवर तिरंगा ध्वजही लावलेला होता. प्रधानमंत्री कार्यालयाचा अधिकारी उपस्थित राहणार असेल तर एक शिष्टाचार ठरलेला असतो आणि पोलिसांनाही तो पाळावा लागतो. परंतु तसा कोणताही अधिकारी शहरात येणार नसल्याची माहिती पोलिसांकडे असल्याने ठोंबरेबाबत शंका आली. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला व त्याचा अंगरक्षक विकास पांडागळे या दोघां अटक करुन त्यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेश ठाकरे करीत आहे.
ठोंबरे कुठला
अशोक भारत ठोंबरे हा मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या उंदरी गावचा रहिवासी आहे. अधिकारी व्हायचे स्वप्न घेऊन तो दिल्लीत अभ्यासासाठी गेला. मात्र यश आले नाही. दिल्लीचा राजथाट त्याच्या मनातून जाईना. मग तेथे त्याने एक ॲकॅडमी सुरू केली. तीही चालली नाही. व्यवसायातही पाऊल ठेवले. तेथेही त्याचे हात भाजले. नीती आयोगातही काही काळ काम केल्याची चर्चा आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती नाही. बीड जिल्ह्यातील काही नेत्यांच्या तो संपर्कात होता. पुढे तो आपण प्रधानमंत्री कार्यालयात अधिकारी म्हणून लागल्याचे सांगू लागला. ही बनवाबनवी अखेर उघडकीस येऊन अंगलट आली.
