भरतीवरील निर्बंध उठून वर्षभराचा कालावधी लोटला, हालचाली थंडच

औरंगाबाद : कारागृह प्रशासनात सेवेत असताना मृत्यू पावलेल्या पोलिसांचे कुटुंबीय अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत कधी सामावून घेतील, याच्या वर्षभरापासून प्रतीक्षेत आहेत. एका पोलिसाची पत्नी तर मागील दहा वर्षांपासून कारागृह प्रशासनाकडे हेलपाटे मारीत आहे. मध्यंतरी भरतीवर घातलेले निर्बंध गतवर्षी १५ फेब्रुवारी रोजी उठवण्यात आल्याचे पत्र पाठवण्यात आल्यानंतरही कारागृह प्रशासनाकडून भरतीसाठी हालचाली थंडच आहेत.

सामान्य प्रशासन विभागाचे राज्याचे अवर सचिव राजेंद्र वाघ यांनी २४ जुलै २०१८ रोजी मध्य विभाग कारागृह उपमहानिरीक्षकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात गट क व गट ड संवर्गातील एका वर्षांत भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या २० टक्के पदे ही अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीने भरण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१८च्या आदेशान्वये सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे म्हटले आहे.

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहांतर्गत येत असलेल्या धुळे कारागृहात सेवेत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले. भरतीसाठी त्या महिलेने काही शैक्षणिक पात्रताही पूर्ण केली. पोलीस विभागाच्या पद्धतीनुसार धावणे आदी प्रक्रियेतून ती महिला गेली. नंतर तांत्रिक कारणावरून तिची भरती रखडली. दरम्यान मध्यंतरी अनुकंपा तत्त्वारील भरतीवर काही कालावधीसाठी निर्बंध आले. कालांतराने तेही उठवण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी कारागृह प्रशासनाने काही मार्गदर्शन सूचनाही मागवल्या. त्यानुसार मार्गदर्शन करून ३१ डिसेंबर २०११ नंतरच्या निुयक्तीच्या प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांच्या भरतीवर निर्बंध नाहीत, वित्त विभागाच्या २ जून २०१५ व २३ सप्टेंबर २०१५च्या शासन निर्णयान्वये घालण्यात आलेले निर्बंध असेपर्यंत गट क व गट ड संवर्गातील एका वर्षांत भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या २० टक्के पदे ही अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीने भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या १५ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशान्वये सूचना देण्यात आल्या आहेत, असे पत्र जुलै २०१८ मध्येच कारागृह प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अद्याप अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत कार्यवाही होत नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मध्य विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून याबाबत माहिती मिळू शकली नाही.

आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे

यापुढील वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची चिन्हे आहेत. त्याच्या आतच भरती प्रक्रिया झाली तर मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा प्रतीक्षेतच दिवस जातील, अशी भावना व्यक्त होत आहेत.

मध्य विभागातील रिक्त पदे

औरंगाबाद मध्य विभागात मराठवाडय़ातील आठ जिल्हे, जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, नाशिक आदी जिल्हे येतात. यातील कारागृहांमध्ये लिपिकांची १९, शिपायांची ८१, परिचारक ११, हवालदार २१, सुभेदार (एक स्टार) १५ पदे रिक्त आहेत, अशी माहिती आहे.