पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार सोहळय़ात प्रतिपादन

औरंगाबाद : तज्ज्ञांनी व्यक्त केलेला हवामान बदलाचा अंदाज मराठवाडय़ासाठी फारसा आशादायी नाही. पर्यायाने शेतीच्या प्रश्नांची गुंतागुंतही वाढत जात आहे. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी मोठय़ा धरणांचे पाणी मिळेलच या आशेवर न राहता, पाणलोट क्षेत्र विकासावर भर देत जुन्या पद्धतीत बदल करून नवीन पिकांचा शोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषिभूषण विजय अण्णा बोराडे यांनी येथे केले.

पद्मविभूषण गोिवदभाई श्रॉफ स्मृति पुरस्काराचे वितरण रविवारी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील उमरी येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयाजी पाईकराव यांना विजय अण्णा बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. वराडे होते. व्यासपीठावर जयाजी पाईकराव, सुशीला पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजय अण्णा बोराडे म्हणाले,की वर्षभरात साधारण ५ वेळा हाती येणारे रेशीम पीक, बांबूची शेती हे शेतकऱ्यांपुढील पर्याय आहेत. तुती लागवडीतून होणाऱ्या रेशीम शेतीत शेतकऱ्यांनी घरातील महिला वर्गालाही सहभागी करून घ्यावे. कारण त्यासाठी संगोपन हा गुण महत्त्वाचा अ्सून तो महिलांमध्ये उपजतच असतो.

बांबू हाही चांगला पर्याय आहे. तेल काढून कॉस्मेटिक वस्तूंमध्ये वापरता येणारे कुरण या पिकाचाही मार्ग चोखाळण्यासारखा आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना सौर पॅनलही शेतीमध्ये बसवून वीज महावितरणला विक्री करता येऊ शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरीच खरा पर्यावरणाचा रक्षक असल्याचे सांगून बोराडे म्हणाले,की वृक्षलागवडीचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा त्यातील अर्थकारण व कार्बन क्रेडिट हे शेतकऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. उसाचे पीक बाद करता येणारे नाही. ऊस कमी पाण्यावरही येऊ शकतो आणि त्यावर रोगराईही नाही. त्यात शेतकऱ्याचे अर्थकारणही असून कारखान्यांनी ऊस नेणे सोडले तरच त्याचे क्षेत्र घटेल, असेही ते म्हणाले. जयाजी पाईकराव यांनी त्यांच्या उगम संस्थेमार्फत केलेल्या सिंचनाशी संबंधित व हिंगोलीतील कयाधू नदीच्या खोऱ्यात केलेल्या कामाची माहिती दिली. कयाधूच्या परिसरातील १४४० किमीचा सव्‍‌र्हे करून त्याचा एक अ्हवाल तयार केला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्यापुढे तो मांडला. पुन्हा नदी परिसरातील गावांना भेटी दिल्या. १०० किमीच्या अंतराने नदीजवळून दिंडी काढली. स्थानिक ग्रामस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. सामाजिक कार्यात स्वामित्त्वाची भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याशिवाय शाश्वत विकासाचे काम साधता येणे शक्य नाही, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात एस. बी. वराडे यांनी सामाजिक कार्यातून जलसंधारण, पाणी व्यवस्थापन काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन सारंग टाकळकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. रश्मी बोरीकर, मंगला खिंवसरा, पी. एस. कुलकर्णी, के. एस. अतकरे, डॉ. खेडगीकर, प्रा. जीवन देसाई, नरहरी शिवपुरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.