औरंगाबाद : टाळेबंदीच्या काळात शेतकरी वर्गाची कुचंबणा होणार नाही, यासाठी किसान सन्मान योजनेंतर्गत तीन टप्प्यात देण्यात येणारी रक्कम अद्यापही शेतक ऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ही रक्कम पोहोचती होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

किसान सन्मान योजनेंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्यात खात्यात जमा होणार आहेत. त्यातील एक हप्ता जमा झाल्याचे शेतकरी सांगत असून दुसरा हप्ता हा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जमा होईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणारी रक्कम जमा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.  गंगापूर तालुक्यातील शेतकरी संतोष जाधव यांनी सांगितले की, सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हातात कुठलेही काम नाही. त्याची जगण्यासाठी मोठी परवड सुरू आहे. किसान सन्मान योजनेतील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली तर तेवढाच त्यांना घर चालवण्यासाठी आधार होणार आहे. वरुड काझी येथील शेतकरी योगेश दांडगे म्हणाले, रक्कम जमा झाल्याच्या संदेशाकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. काहींना संदेश येत आहेत. मात्र, बँक खात्यावर रक्कम दाखविली जात नाही.

आडगावचे अशोक लोखंडे यांचाही असाच सूर होता. त्यांनी सांगितले की, गावातील मजुरी करणारे, गरीब लोकांना मिळणारी रक्कम जनधन खात्यावर जमा झालेली आहे. मात्र, किसान सन्मानची रक्कम मिळालेली नाही. आम्ही सर्व ही रक्कम जमा कधी होईल, याकडे लक्ष लावून बसलो आहोत.

करोना आपत्ती निधी द्यायला हवा

शेतकरी सध्या सर्वात जास्त अडचणीत आहे. करोनासारख्या जागतिक आपत्ती काळातही शेतकरी दूध, भाजीपाला, धान्याचा पुरवठा करतो आहे. हे सर्व करताना तोही एकप्रकारे करोनाची लागण होण्याच्या धोकादायक परिस्थितीतून जात आहे. तेव्हा त्यालाही आरोग्यसेवक, कर्मचारी, डॉक्टर, पोलिसांप्रमाणे ५० लाखांचा विमा कवच देणे अपेक्षित होते. मात्र, त्याची साधी दखलही पंतप्रधानांनी घेतली नाही. त्याचा रब्बीचा पीकविमाही उतरवलेला नाही. धान्य घरात येऊन पडले आहे. ते विक्रीही करता येत नाही. त्याला कीड लागण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा २००५ अंतर्गत मदत द्यावी. त्याचे स्वरूप कोरडवाहूतील सरसकट शेतकऱ्याला एकरी ५० हजार, तर बागायती क्षेत्राला एक लाख रुपये असे असावे. किसान सन्मान योजनेतील मदत न शोभणारी आहे.