औरंगाबादच्या बिबी का मकबऱ्यासह परिसरातील लेणी, दौलताबाद किल्ला या ऐतिहासिक स्थळांना भेटी देणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. गतवर्षीचा व या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील विदेशी पर्यटकांच्या संख्येशी तुलना केली तर २ हजार पर्यटक कमी झाले आहेत. घटणाऱ्या या संख्येचा परिणाम प्रशासनाला मिळणाऱ्या महसुलासह पर्यटकांच्या आधारावर चालणारे हॉटेल, वाहनांच्या व्यवसायावरही होताना दिसत आहेत. हे चित्र केंद्र सरकारने घेतलेल्या ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद शहर मराठवाडय़ाची तशी पर्यटनाचीही राजधानी आहे. बिबी का मकबरा, पाणचक्की यांच्यासह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरुळच्या लेणी, पांडव लेणी, अजिंठय़ाची लेणी, एलोरा ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा ओघ हा तसा हिवाळय़ात म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होतो. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर ५ हजार ९५२ विदेशी पर्यटकांनी उपरोक्त पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. त्या पोटी भारतीय पर्यटकांकडून २३ लाख ४२ हजार ६२५, तर विदेशी पर्यटकांकडून ११ लाख ९९ हजार ५५० रुपयांचा महसूल मिळाला आहे.  गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ३ लाख ६९ हजार ७५० भारतीय तर ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. त्यामधून भारतीय पर्यटकांकडून २६ लाख २८ हजार ७१० तर विदेशी पर्यटकांकडून १८ लाख १६ हजार ६०० महसूल मिळाल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाकडील आकडेवारी दर्शवते.  या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ५ हजार ७१० विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली . त्यातून २३ लाख ६८ हजार महसूल मिळाला. नोव्हेंबर महिन्यात ६८०० विदेशी नागरिकांनी भेट दिली. गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना केली तर तब्बल २ हजार ३९ पर्यटकांची संख्या घटल्याचे स्पष्ट होते. हीच परिस्थिती भारतीय पर्यटकांबाबतही आहे. गतवर्षीपेक्षा भारतीय पर्यटकही ३६ हजार ५८१ एवढे कमी झाले .     भारतीय पुरातत्त्व विभागाकडेच नव्हे तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडेही विदेशी पर्यटकांची नोंद बोटांवर मोजण्याइतकीच आहे. महानगरपालिकेच्या पर्यटक माहिती केंद्राकडे २२ नोव्हेंबरपासून २८ विदेशी पर्यटकांची नोंद आहे. ही सर्व मंडळी मित्र किंवा कुटुंबीयांसोबत आलेली होती. १३ डिसेंबपर्यंत जवळपास ८० विदेशी पर्यटकांनी कार्यालयाशी संपर्क साधला होता, अशी माहिती मिळाली.

महिना पाच हजारांचे नुकसान

विदेशी पर्यटकांच्या घटणाऱ्या संख्येमुळे पर्यटन महामंडळाबाहेर खासगी वाहनांतून औरंगाबाद व परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवणाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. गोविंद चोबे हे एका खासगी वाहनावर चालकाचे काम करतात. सध्या ते बसून आहेत. पगाराचे मीटर सुरू असले तरी दररोजचा मिळणारा दीडशे-दोनशे रुपयांचा भत्ता बुडत असल्याचे चोबे सांगतात.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign tourists flow reduce in aurangabad after demonetization
First published on: 16-12-2016 at 01:36 IST