छत्रपती संभाजीनगर : भूम- परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून थोडक्यात पराभूत झालेले माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांचा राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रवेश होणार आहे. सोमवारी रात्री भूम-परंड्यातील २५० ते ३५० कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. परंड्याचे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात फिरकत नसल्याने या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी राहुल मोटे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे सत्तेच्या अधिक जवळ जाण्यासाठी राहुल मोटे यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचे ठरविले असल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान पक्षांतरांच्या वृत्ताबाबत आताच काही बोलता येणार नाही, असे राहुल मोटे म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून केवळ १ हजार ५०९ मतांनी तानाजी सावंत निवडून आले. या निवडणुकीमध्ये राहुल मोटे यांचा पराभव झाला. मात्र, निवडून आल्यानंतर तानाजी सावंत मतदारसंघात एकदाही फिरकलेच नाहीत. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही त्यांनी लक्ष घातले नाही. या संस्थेवर आता राहुल मोटे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या निवडणुकीत ४५ अर्ज माघारी घेतल्यानंतर खरेदी विक्रीसंघाची निवडणूक बिनविरोध झाली. खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राम खंडागळे म्हणाले, ‘मंगळवारी राहुल मोटे यांचा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते या प्रवेश सोहळयासाठी मुंबईकडे निघालो आहोत.’ या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.
दरम्यान मराठवाड्यातील काँग्रेसमधील कार्यकर्ते भाजपमध्ये जात असल्याचे चित्र असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून बाहेर पडून अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. अलिकडेच कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला तर अजित पवार गटात जालना जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते नुकतेच झाले आहेत. भूममध्ये साखर कारखाना उभा करुन देण्यासाठी राहुल मोटे यांना अजित पवार यांनी मदत केली होती. राहुल मोटे यांना गोदावरी पाटबंधारे मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. या नियुक्ती व्हावी म्हणून अजित पवार यांचा मोठा आग्रह होता. राहुल मोटे २००४, २००९ आणि २०१४ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ते सलग दुसऱ्यांदा तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाले. मात्र, सावंत यांच्या मतदारसंघातील अनुपस्थितीमुळे राहुल मोटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. नव्या प्रवेशामुळे परंडा मतदारसंघात पुन्हा चुरशीचे चित्र निर्माण होईल, असा दावा केला जात आहे.