औरंगाबाद : मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली व नांदेडमध्ये ४६ अंशांपर्यंत तापमान गेल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना आता पुढील चार दिवस दिलासादायक वातावरण अनुभवण्यास मिळणार आहे. तापमानाचा पारा साधारण चार अंश सेल्सिअसने उतरलेला दिसणार आहे.

मराठवाडय़ातील सर्वाधिक उष्ण शहरे म्हणून परभणी व हिंगोलीचे नाव पुढे आले. मागील चार दिवसांत दोन्ही शहरातील पारा ४५ ते ४६ अंशांवर गेला होता. उष्णतेची ही लाट मराठवाडाभर होती. बीडमध्ये तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तापमानाची चढती भाजणी आणखी ४७ ते ४८ अंशांवर जाते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली. मात्र फनी चक्रीवादळाची दिशा बदलली आणि वाऱ्याची दिशा भारतातील पूर्वोत्तर भागाकडे वळली. त्यामुळे तापमानात घट झाली. तापमान ३ ते ४ अंशांनी खाली उतरले. बुधवारी रात्रीच्या वाऱ्यामध्ये काहीसा गारवा होता. छतावर किंवा मोकळ्या हवेत झोपणाऱ्यांना हा वारा अधिकच गार वाटला. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होते की काय, असा अंदाज बांधला जाऊ लागला. मात्र महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मात्र अवकाळी पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले.

फनी वादळाची दिशा बदलली

फनी वादळाची दिशा पूवरेत्तर राज्यांच्या दिशेकडे वळली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस तापमानात ३ ते ४ अंशांपर्यंत घट होईल. त्यानंतर मात्र पुन्हा तापमान वाढेल.

– श्रीनिवास औंधकर अभ्यासक.